पिंपरी(प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीसमोर एका अनोळखी रिक्षा चालकाने अश्लील कृत्य केले. गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी पकडू नये म्हणून त्याने रिक्षाची सजावटही बदलली. मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्याच.
सचिन देविदास शेंडगे (वय 33, रा. किनारा हॉटेलजवळ, दापोडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास बारा वर्षीय मुलगी खासगी शिकवणीवरून घरी जात असताना एका अनोळखी रिक्षा चालकाने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिला थांबविले. त्यानंतर तिच्यासमोर अश्लील कृत्य केले. तिच्या पालकांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांना एका ठिकाणी सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये एका रिक्षाचा अस्पष्ट नंबर दिसून आला. त्यानुसार अशा नंबरच्या आणि वर्णनाच्या रिक्षाचा शोध पोलिसांनी सुरू केला. मात्र त्यातून काही उपयुक्त माहिती हाती आली नाही.
पोलिसांना दापोडी येथील (एमएच 12 क्यूआर 6105) या रिक्षाचा क्रमांक मिळाला. पोलिसांनी जाऊन पाहणी केली असता दिलेल्या वर्णनाप्रमाणे रिक्षा नव्हती. पण रिक्षा चालकाचे वर्णन मिळते-जुळते होते. पोलिसांनी रिक्षाचे निरीक्षण केले असता तयावर भगव्या रंगाच्या रेडिअमने आई आणि गणपतीचे चित्र नुकतेच काढल्याचे दिसून आले. सदरचा रिक्षाचालक भूमकर चौक, वाकड येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त आनंद भोईटे, सहायक आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सुनील दहीफळे, सोन्याबापू देशमुख, सहायक निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, कर्मचारी महेश वायबसे, बंडू मारणे, कुणाल शिंदे, रितेश कोळी, अरूण नरळे, चंद्रकांत गडदे, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, अमर राणे, दत्ता शिंदे, सुभाष गुरव आणि नुतन कोंडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.