गुन्हे अन्वेषण पथकाने मुसक्या आवळल्या
तळेगाव ढमढेरे-गेल्या दहा दिवसांपूर्वी सातकरवाडी येथे मुलगा शेतात गेला आणि घरावर दरोडा टाकून गंभीर जखमी करून टाकणारे अट्टल दोन दरोडेखोरांना पकडून मुसक्या आवळल्या असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
मानसुक उर्फ निगऱ्या अर्पण भोसले (वय 30, रा. पारनेर जि. अहमदनगर), किरण विठ्ठल म्हस्के (वय 25, रा. सांगवी सूर्या, ता. पारनेर) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी सातकरवाडी (ता. शिरूर) येथे दहा दिवसांपूर्वी टाकलेल्या दरोड्यात महिलेला मारहाण करून गंभीर जखमी केले होते. त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम मोबाईल फोन तसेच शेजारी कैलास कोकरे यांचा वाय-फाय मोडियम असे एकूण 1 लाख 68 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. यामुळे परिसरामध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. व यातील आरोपी तात्काळ अटक करण्याची मागणी होत होती.
घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांनी गुन्ह्याची उकल करून आरोपींचा शोध आणि या गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे गुन्हे शाखेचे एक पथक आरोपींच्या मागावर होते. गोपनीय खबऱ्याकडून माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील काही आरोपी हे पारनेर परिसरात राहणारे असून रांजणगाव परिसरामध्ये येणार आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर धनवट यांनी त्यांचे पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना रवाना केले. रांजणगाव गणपती परिसरामध्ये हे दोघे पोलिसांची चाहूल लागताच पळून जाऊ लागले. पोलिसांनी 3 ते 4 किलोमीटर डोंगराळ भागात आरोपींचा पाठलाग करून ताब्यात घेतले.
चौकशीअंती त्यांनी आणखी तीन साथीदारांच्या मदतीने सातकरवाडी येथील वृद्ध महिलेला मारहाण करून सोन्याचे दागिने रोख रक्कम व मोबाईल फोन इत्यादी आरोपीने गंभीर स्वरूपाचा दरोडा टाकला असल्याची कबुली दिली.
- महिलेचा डोळा कायमचा निकामा…
या दरोड्यातील चोरट्यांनी चोरी करून महिलेला जबर मारहाण केली होती. या मारहाणीमध्ये पार्वतीबाई सातकर यांच्या डोळ्याला गंभीर जखम झालेली असल्याने त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करून डोळा काढावा लागला आहे. त्यामुळे चोर पकडले; मात्र महिलेचा डोळा कायमस्वरूपी निकामी झाला असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.