पिंपरी – शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन मेडिकव्हर, केएलई संस्था स्थापन केली. सामाजिक ऋण फेडण्यासाठी लक्ष्य संस्थेने डोळ्यासमोर ठेवले. रुग्णांना उत्तम प्रकारची सेवा देऊन त्यांचा विश्वास संपादन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी केले.
इंद्रायणीनगर भोसरी येथे मेडिकव्हर हॉस्पिटलच्या 300 बेडसचे अद्ययावत मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नाना काटे, विक्रांत लांडे, मयूर कलाटे, मेडीकव्हर ग्रुपचे अध्यक्ष फ्रेडरिक स्टेनमो, डॉ. प्रभाकर मोरे आदीसह मान्यवर या वेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, पिंपरी-चिंचवडने मला तीन वेळा भरघोस मतांनी निवडून दिले. या शहरात कामगारांची संख्या अधिक आहे. त्यांचा विचार करून रुग्णसेवा देणे गरजेचे आहे. फॅमिली डॉक्टरसारखे नाते तयार करणे गरजेचे आहे. त्यामुळे 50 टक्के रुग्ण आधीच बरा होतो.
…तर बेळगावदेखील द्या
मेडिकव्हर रुग्णालयाच्या अनेक शाखा कर्नाटकात मोठ्या प्रमाणात आहेत. रुग्णालय प्रत्येक ठिकाणी उभे राहत आहे. त्या प्रत्येक संस्थेच्या उद्घाटनाला मी उपस्थित राहत आहे. दर वेळी मला उद्घाटनाला बोलावता. मी आलो. रुग्णालय प्रशासनाकडे मी काहीच मागितले नाही. मात्र बेळगाव महाराष्ट्राला द्या, अशी एकच मागणी केली असल्याचे पवार यांनी सांगताच एकच हशा पिकला. बेळगाव द्या किंवा देऊ नका, तुम्हाला महाराष्ट्रात आवश्यक ती मदत करू, असेही पवार या वेळी म्हणाले.