बंगलुरू – भारतातर्फे पहिली मानवासहित अंतरिक्ष मोहीम गगनयान या नावाने राबवली जाणार असून त्या मोहिमेसाठी निवडण्यात आलेल्या चार अंतराळवीरांच्या प्रशिक्षणाची कार्यक्रम पुन्हा सुरू झाला आहे. त्यांना रशियात प्रशिक्षण दिले जात आहे. करोनामुळे त्यांचे हे प्रशिक्षण काही काळ थांबवण्यात आले होते.
रॉसकॉसमॉस या रशियन अंतरीक्ष कार्पोरेशननेहीं ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, गागारिन संशोधन आणि अंतराळ प्रशिक्षण केंद्रात 12 मे पासून त्यांचे हे प्रशिक्षण सुरू झाले आहे. भारत आणि रशिया यांच्यातील करारानुसार चार अंतराळवीरांना रशियात हे प्रशिक्षण दिले जात आहे. या चारही भारतीय अंतराळवीरांची तब्बेत उत्तम आहे. करोना विषयक सर्व दक्षता घेऊनच त्यांचे हे प्रशिक्षण सुरू असल्याचे या संस्थेने म्हटले आहे. अंतरीक्षवीरांच्या वेषात भारतीय ध्वजासह या अंतराळवीरांचे छायाचित्रही या संस्थेने प्रसिद्ध केले आहे.
भारताची ही गगनयान मोहीम सन 2022 साली हाती घेतली जाणार असून त्यासाठी तब्बल दहा हजार कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. 10 फेब्रुवारीपासून या अंतराळवीरांचे रशियात प्रशिक्षण सुरू आहे. रशियातील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतीय यानाच्या संबंधात त्यांना पुन्हा भारतात प्रशिक्षण दिले जाणार आहे.