‘जुन्नर’च्या आदिवासी भागातील तरुणाची ‘यूपीएससी’ परीक्षेत गगन भरारी

जुन्नर  – तालुक्यातील आदिवासी भागातील शिरोली पूर गावातील व सध्या वाई येथे वास्तव्यास असणाऱ्या सचिन देवराम लांडे याने नुकत्याच जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे. त्यांना (All India Rank) AIR ५६६ मिळाली आहे. संबंध पुणे जिल्ह्यात आदिवासी भागातून यूपीएससी परीक्षेत यश मिळवणारा सचिन हा बहूधा पहिलाच व्यक्ती असावा.

सचिनच्या या यशात त्याचे आई-वडील यांचे मोलाचे योगदान आहे. सचिनचे वडील देवराम लांडे हे शासकीय मुद्रणालय वाई येथे कार्यरत आहेत. तर आई द्रौपदी असून त्या गृहिणी आहेत. लहानपणी सचिनची प्रचंड बुद्धिमत्ता पाहून माजी उपजिल्हाधिकारी दादाभाऊ जोशी यांनी सचिनला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत येण्याचा सल्ला दिला होता. तसेच ते त्याला वेळोवेळी मार्गदर्शनही करत होते.

सचिनचे प्राथमिक शिक्षण महिला स्नेहसंवर्धक समाज प्राथमिक विद्यामंदिर, वाई येथे झाले असून माध्यमिक शिक्षण द्रविड हायस्कूल, वाई येथे झाले आहे. तसेच उच्च माध्यमिक शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे घेतल्यानंतर २०१८ मध्ये सचिन शासकीय अभियांत्रिकी विद्यालय, पुणे येथून अभियांत्रिकी ची पदवी घेऊन सिव्हिल इंजिनिअर झाला आहे.

Upsc परीक्षेत यश मिळवण्यापूर्वी एमपीएससीमार्फत सचिन ची निवड नायब तहसीलदार पदी झाली होती. मागील अनेक वर्षापासून घेत असलेल्या मेहनतीच्या जोरावर त्याने वयाच्या पंचवीशीतच यूपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे. त्याच्या या यशामुळे जुन्नर तालुक्यात आनंद व्यक्त केला जात असून सचिनचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

“सचिनच्या यशाबद्दल त्याचे व त्याच्या कुटुंबियांचे तसेच सर्व मार्गदर्शकांचे मनःपूर्वक अभिनंदन! सचिनच्या यशामुळे शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याची मान निश्चितच अभिमानाने उंचावली असून त्याच्या कामगिरीचा सार्थ अभिमान मला व शिवजन्मभूमीतील प्रत्येक नागरिकाला आहे.”
– अतुल बेनके, आमदार

“वाईला तहसीलदार म्हणून काम पाहत असताना सचिन साडेतीन वर्षे वयाचा असताना माझ्याकडे यायचा आणि चक्क घरी आलेले पेपर वाचत असायचा,तेव्हाच त्याची बुद्धिमत्ता पाहून त्याने मोठा अधिकारी व्हावे अशी मनोमन इच्छा होती,त्यादृष्टीने त्याला योग्य मार्गदर्शन केले, प्रथम प्रयत्नात आलेल्या अपयशाने खचून न जाता फळी फोड करून सचिन केवळ आदिवासी भागातील युवकांसाठीच नव्हे तर शिवजन्मभूमितील सर्वच युवकांसाठी आयडॉल ठरला आहे.”
– दादाभाऊ जोशी, माजी उपजिल्हाधिकारी

“माझ्या यशामध्ये आई वडिलांचा सर्वात मोठा वाटा असून आईने प्राथमिक शिक्षणाचे धडे दिल्याने शाळेत जाण्यापूर्वीच लिहिता वाचता येत होते.लहानपणी वाईचे तहसीलदार दादाभाऊ जोशी यांना पाहूनच अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले होते.त्यांचे बहुमोल मार्गदर्शन आणि दिलेला आत्मविश्वास महत्वाचा होता. स्पर्धापरिक्षेच्या बाबतीत युवकांनी मनामध्ये न्यूनगंड तसेच यशअपयशाची चिंता न करता आपल्या ध्येयाप्रती सतत प्रयत्न करत राहिले पाहिजे.त्याचप्रमाणे प्रशासकीय पदाच्या माध्यमातून आदिवासी समाजबांधवांसाठी समाजहिताच्या नवीन योजना तसेच योगदान देण्याचा मानस आहे.”
– सचिन देवराम लांडे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.