Gadre Seafoods-MSLTA ITF Grade 3 Jr. Tennis C’ship 2024 : – दुहेरीत मुलांच्या गटात रशियाच्या ॲलन आयउखानोव व फेडर अल्तुखोव यांनी, तर मुलींच्या गटात जपानच्या कोकोमी सायटो व रिओ वाकायामा यांनी एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना गद्रे सीफूड्स करंडक आयटीएफ ग्रेड 3 कुमार 18 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. एकेरीत मुलींच्या गटात रिशीता रेड्डी बासिरेड्डी हिने तर, मुलांच्या गटात अर्जुन राठी या भारतीय खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
मुलांच्या गटाच्या उपांत्य फेरीत भारताच्या अर्जुन राठी याने अमेरिकेच्या विहान रेड्डीचा 7-5, 6-2 असा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. ही लढत 1 तास 45मिनिटे चालली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत फ्रांसच्या पाचव्या मानांकित ऍरोन गॅबेट याने रशियाच्या फेडर अल्तुखोव्हचा 7-5, 6-2 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. मुलींच्या गटात उपांत्य फेरीत जपानच्या अव्वल मानांकित आओई वटनाबीने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत इराणच्या चौथ्या मानांकित यासमन यझदानी चा 6-4, 7-5 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या मानांकित भारताच्या रिशीता रेड्डी बासिरेड्डीने भारताच्या ऐश्वर्या जाधवचा 6-3, 4-6, 7-6(3) असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
दुहेरीत मुलांच्या गटात अंतिम फेरीत रशियाच्या ॲलन आयउखानोव व फेडर अल्तुखोव यांनी दुसऱ्या मानांकित न्यूझीलंडच्या कोडी ऍटकिन्सन व अमेरिकेच्या रोशन संतोष यांचा 7-5, 7-6(7) असा पराभव करून विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात अंतिम फेरीत जपानच्या कोकोमी सायटोने रिओ वाकायामाच्या साथीत भारताच्या रिया सचदेवा व जपानच्या आओई वटनाबीचा 6-3, 3-6, 10-8 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. स्पर्धेतील दुहेरी गटातील विजेत्या जोडीला एमव्ही देव करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण आयटीएफ व्हाईट बॅच रेफ्री लीना नागेशकर, माजी डेव्हिस कप खेळाडू संदीप कीर्तने, डेक्कन जिमखानाच्या टेनिस विभागाचे सचिव डॉ विक्रांत साने, आयटीएफ सुपरवायझर वैशाली शेकटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
Maharashtra State Table Tennis C’ship 2024 | सतरा वर्षांखालील गटात यजमान पुणे संघाला दुहेरी मुकुट…
निकाल : एकेरी उपांत्य फेरी :
मुले : अर्जुन राठी वि. वि. विहान रेड्डी 7-5, 6-2, ऍरोन गॅबेट वि. वि. फेडर अल्तुखोव्ह 7-5, 6-2.
मुली : आओई वटनाबी वि. वि. यासमन यझदानी 6-4, 7-5, रिशीता रेड्डी बासिरेड्डी वि. वि. ऐश्वर्या जाधव 6-3, 4-6, 7-6(3);
दुहेरी : अंतिम फेरी : मुली : कोकोमी सायटो – रिओ वाकायामा वि. वि. रिया सचदेवा – आओई वटनाबी 6-3, 3-6, 10-8.
मुले : ॲलन आयउखानोव – फेडर अल्तुखोव वि. वि. कोडी ऍटकिन्सन – रोशन संतोष 7-5, 7-6(7).