– सतेज औंधकर
रायगड – किल्ले रायगडावर युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते गडपुजन करून गडपुजनाने शिवराज्याभिषेक सोहळ्यास सुरुवात झाली. सांयकाळी गडदेवता शिरकाई देवीसमोर पारंपरिक गोंधळ घालण्यात आला. यावेळी छत्रपती शिवरायांच्या नामघोषाने आणि शिवकालीन मर्दानी खेळाने गडावरील वातावरण शिवमय झाले होते.
उद्या ६ जुन या मुख्य दिवशी सकाळी ध्वजारोहन, पालखी सोहळा आणि राजसदरेवरील मेघडंबरीतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीवर सुवर्ण नाण्याचा अभिषेक समितीचे मार्गदर्शक श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती व यौवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते होणार आहे.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मोजक्याच शिवप्रेमींच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार असुन गर्दी टाळण्यासाठी सोहळ्याचे सोशल मिडियाद्वारे लाइव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. रायगड प्राधीकरणाचे अध्यक्ष आणि समितीचे प्रमुख श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती व यौवराज शहाजीराजे छत्रपती दुपारी गडावर चालत आले. यावेळी स्थानिक नागरीकांनी त्यांचे स्वागत केले. सोहळ्याच्या तयारीसाठी समितीचे प्रमुख कार्यकर्ते किल्ले रायगडावर दाखल झाले आहेत.
या सोहळ्याची तयारी संभाजीराजे व युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. समितीचे मार्गदर्शक श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती व यौवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणाने साजरा होणार आहे. त्यानुसार अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, कार्याध्यक्ष हेमंत साळोखे, सुखदेव गिरी, विनायक फाळके, संजय पोवार, सत्यजित आवटे, राहुल शिंदे, सागर पाटील, प्रसन्न मोहीते, अमर पाटील, योगेश केदार, दयानंद हुबाळे, अमर जुगर, दीपक सपाटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते दुर्गराज रायगडावर दाखल झाले आहेत.
आज असा होणार सोहळा –
– ध्वजपूजन व ध्वजारोहन, स्थळ : नगारखाना
– युवराज संभाजीराजे छत्रपती व यौवराज शहाजीराजे छत्रपती यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सव मुर्तीसह राजसदरेवर आगमन
– युवराज संभाजीराजे छत्रपती व शहाजीराजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक
– मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांना सुवर्ण नाण्यांचा अभिषेक
– युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे शिवभक्तांना मार्गदर्शन
– युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सव मूर्तीसह जगदीश्वराचे दर्शनासाठी प्रस्थान
– छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळास अभिवादन
२५ कार्यकर्ते : ११०० पोलीसांचा बंदोबस्त
मराठा आरक्षणाच्या धर्तीवर खा.संभाजीराजे छत्रपती यांनी ६ जुनपर्यंत राज्यशसनाला निर्णय घेण्यासाठी अल्टीमेंट दिला आहे. निर्णय न घेतल्यास पुढील भूमिका किल्ले रायगडवरून स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या पा२र्व भूमिवर महाड पासुन किल्ले रायगडपर्यंत पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
राज्य शासनाने या सोहळयासाठी समितीच्या केवळ २५ कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. या कार्यकर्त्यांशीवाय अन्य कोणालाही गडावर येण्यास बंदी घातली आहे. त्याकरीता ११०० हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.