गडकरींचे तर्कशून्य वक्तव्य; म्हणे २ कोटी रोजगार दिले- राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीका केली आहे. गडकरी यांनी नोकऱ्या आहेतच कुठे? असे वक्तव्य काही काळापूर्वी केले होते. पण आपल्या वक्तव्यावरून सरळ घुमजाव करत आता गडकरी यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत २ कोटी रोजगार माझ्याच खात्याने दिले असल्याचे तर्कशून्य वक्तव्य गडकरींनी केले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.

देशातील बेरोजगारीचा दर गेल्या ४५ वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याची माहिती राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या अहवालातून समोर आली आहे. असे असताना नितीन गडकरी कशाच्या आधारे रोजगार दिल्याचे सांगत आहेत? त्यामुळे या अजब कारभाराला म्हणावे तरी काय? असा प्रश्न देखील राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला.

दोन कोटी रोजगार तर फक्त माझ्या मंत्रालयाने दिले आहेत. माझ्या विभागाने १७ लाख कोटींची कामे दिली आहेत, ती भारत सरकाच्या बजेटपेक्षा अनेक पट जास्त आहे. दोन कोटी रोजगार तर फक्त माझे खातेच देत आहे. त्याचे आकडे आहेत. ई-रिक्षा पाहा. एक कोटी लोक हातरिक्षा चालवत होते, हा रोजगार नाही का? दिल्लीच्या पोलिस आयुक्तांनी सांगितले की, ई-रिक्षामुळे रोजगार मिळाल्याने राजधानीत गुन्हे घटले. असे गडकरी म्हणाले.

दरम्यान, भाजप नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र फेब्रुवारी २०१९ मध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले दिसून आले आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (सीएमआयई) बेरोजगारीसंदर्भात नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार फेब्रुवारीमध्ये बेरोजगारीचा दर ७.२ टक्के राहिला आहे. मागील वर्षी हाच दर ५.९ टक्के एवढा होता. मागील २.५ वर्षातील हा बेरोजगारीचा सर्वाधिक आकडा असल्याचे समोर आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.