मुंबई – इथेनॉलवर चालणाऱ्या फ्लेक्स इंजिनला सरकार लवकरच परवानगी देणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितले.
ब्राझील, अमेरिका, कॅनडा इत्यादी देशांनी अगोदरच फ्लेक्स इंजीनला परवानगी दिली आहे. त्याचबरोबर बीएमडब्ल्यू, मर्सिडीज बेंझ, टोयोटा इत्यादीसारख्या कंपन्या इथेनॉलवर आधारित वाहने निर्माण करीत आहेत. स्थानिक पातळीवर तयार केलेले इथेनॉल इंजिनात वापरल्यानंतर त्यामुळे क्रूड तेलाची आयात कमी होण्यास मदत होईल, असे गडकरी म्हणाले.
या संदर्भातील आवश्यक परवानग्या येत्या तीन महिन्यात देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. इथेनॉलच्या पेट्रोल पंपांना परवानगी देण्यात येत आहे. अशा प्रकारच्या दोन पेट्रोल पंपाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
उसाचा रस आणि मळीपासून इथेनॉल तयार करण्याला अगोदरच परवानगी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आता तांदूळ, मका आणि इतर अन्नधान्यापासून इथेनॉल तयार करण्याला परवानगी देण्याचा विचार चालू आहे.
तमिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा असे त्यांनी सांगितले. देशात अतिरिक्त तांदूळ आणि गव्हाचे उत्पादन होते. याचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी केला जाऊ शकतो. बजाज ऑटो आणि टीव्हीएस या कंपन्यांनी इथेनॉलवरवर चालणाऱ्या दुचाकी तयार केल्या आहेत.