गाडगीळ कुटुंबात 7 वेळा उमेदवारी

एकेकाळी गाडगीळ कुटुंबाचा पुणे शहराच्या राजकारणावर फारच प्रभाव होता. आतापर्यंत झालेल्या लोकसभेच्या सोळा निवडणुकांमध्ये गाडगीळ कुटुंबाल म्हणजे काकासाहेब व विठ्ठलराव या पितापुत्रांना तब्बल सात वेळा कॉंग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाली.

काकासाहेब गाडगीळ 1952 मध्ये पुण्यातील पहिली निवडणूक जिंकले तर नंतर बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांनी 1980, 84 व 89 अशा सलग तीन निवडणूका जिंकून वियाची हॅटट्रिक साधली. मात्र काकासाहेबांना एकदा (1957) व विठ्ठलरावांना दोनदा (1967 व 1991) पुणेकरांनी पराभवाचा हिसकाही दाखविला.1952 च्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत काकासाहेब गाडगीळ यांनी शेकापच्या केशवराव जेधे यांचा पराभव करून विजयी सलामी दिली. पण 1957 च्या दुसऱ्या निवडणुकीत संयुक्‍त महाराष्ट्राच्या चळवळीच्या पार्श्‍वभूमीवर प्रजा समाजवादी पक्षाचे नेते नानासाहेब गोरे यांच्याकडन पराभवाची नामुष्की पत्करावी लागली होती.

बॅ. विठ्ठलराव गाडगीळ 1967 मध्ये पुण्यातून प्रथम लोकसभा निवडणूक लढले, पण ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांच्यापुढे त्यांचा टिकाव लागू शकला नाही. पण पुढे 1980, 84 व 89 अशा सलग तीन निवढणुकात पुणेकरांनी त्यांना आपला प्रतिनिधी म्हणून लोकसभेत पाठविले. त्यांची पुण्यातील विजयाची हॅटट्रिक अजून कोणी मोडू शकलेले नाही. 1991 मध्ये त्यांना सलग चौथा विजय मिळवून “ग्रॅण्ड स्लॅम’ करण्याची संधी होती, पण कॉंग्रेसमधील एका “पॉवरफुल’ गटाकडून दगाफटका झाल्याने त्यांची ही संधी हुकली आणि भाजपला पुण्यातील पहिला विजय नोंदविता आला. 1977 मध्ये आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत बॅ. गाडगीळ यांना बारामतीतून कॉंग्रेसची उमेदवारी मिळाली पण जनता पक्षाच्या लाटेत तेथे त्यांना हार पत्करावी लागली. विठ्ठलराव तीनदा लोकसभा न्निवडणूक जिंकले तसेच तीनदा पराभूतही झाले. काकासाहेब व विठ्ठलराव या गाडगीळ पिता-पुत्रांना केंद्रीय मंत्रिमंडळात काम करण्याची संधीही मिळाली.
– शेखर कानिटकर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)