Accident News : गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली-चामोर्शी मार्गावर तळोधी गावाजवळ भीषण अपघात घडला असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची स्कॉर्पिओ गाडी रामपूरहून भाडभीडी मोकासाकडे जात होती. या वाहनात एकूण 16 जण प्रवास करत होते. दरम्यान, तळोधी गावाजवळील धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्स वाहनाने स्कॉर्पिओला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की स्कॉर्पिओचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी तातडीने मदतकार्य सुरू केले. लग्नाच्या आनंदाचे काही क्षणांतच शोकांतिकेत रूपांतर झाले. अपघातातील जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारासाठी नेत असताना दोन जणांचा वाटेतच मृत्यू झाला. सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या काही जखमींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.