पुणे – महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे भवितव्य या महाविद्यालयासाठी नेमलेल्या सल्लागाराच्या अहवालावर अवलंबून असणार आहे. महाविद्यालय होईल का नाही, याचा फिजिबिलिटी रिपोर्ट अर्थात व्यवहार्यता अहवाल सल्लागाराकडून पहिल्या टप्प्यात दिला जाणार असून त्यात हे स्पष्ट होणार आहे.स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी भाजपने गेल्या दोन अंदाजपत्रकांत निधी प्रस्तावित केला आहे.
त्यासाठी स्थायी समिती आणि मुख्यसभेने मान्यता दिल्यानंतरही पालिका प्रशासनाकडून महाविद्यालयासाठी 600 कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगत सल्लागार नेमण्यात टाळाटाळ केली जात होती. मात्र, मार्चमध्ये मुख्यसभेत माजी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्तांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
त्यावेळी महापौरांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने तातडीने सल्लागाराला कार्यादेश दिले होते. त्यानुसार, सात टप्प्यात हे काम केले जाणार असून पहिल्या टप्प्यात महाविद्यालय होते किंवा नाही, तसेच त्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा पालिकेकडे आहे किंवा नाही याचा अहवाल तयार केला जाणार आहे.