नवी दिल्ली, दि.22- फ्युचर समूहाने आपला बहुतांश व्यवसाय रिलायन्स इंडस्ट्रीजला विकला आहे. या व्यवहारावर स्थगिती आणणारा निर्णय गेल्या आठवड्यात दिल्ली उच्च न्यायालयातील एक सदस्यीय खंडपीठाने दिला होता. या निर्णयाविरोधात फ्युचर समूहाने दिल्ली उच्च न्यायालयातील विस्तारित खंडपीठाकडे दाद मागितली आहे.
विस्तारित खंडपीठाने एक सदस्यीय खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे शेअर बाजारात फ्यूचर समूहातील कंपन्यांच्या शेअरचे भाव 10 टक्क्यापर्यंत वाढले. विस्तारित खंडपीठाने ऍमेझॉन कंपनीला यासंदर्भात नोटीस जारी केली आहे. फ्युचर समूह आणि रिलायन्स दरम्यानच्या व्यवहाराला ऍमेझॉन कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयातील एक सदस्यीय खंडपीठात आव्हान दिले होते. विस्तारित खंडपीठाने पुढील सुनावणी लवकरच घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.
यासंदर्भातील सुनावणी 30 एप्रिल रोजी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. फ्युचर समूह आणि ऍमेझन दरम्यान काही वर्षांपूर्वी एक व्यवहार झाला होता. त्यामुळे आम्हाला न विचारता फ्युचर समूहाला पुढील व्यवहार करता येणार नाही अशी ऍमेझॉन कंपनीची भूमिका आहे. रिलायन्स आणि फ्युचर दरम्यान झालेल्या व्यवहाराला ऍमेझॉन कंपनीने जागतिक लवादात आव्हान दिले होते.
लवादाने ऍमेझॉनच्या बाजूने निर्णय दिला आहे.
या निर्णयाची वेगात अंमलबजावणी करावी म्हणून ऍमेझॉन कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयातील एक सदस्यीय खंडपीठाकडे याचिका दाखल केली होती. एक सदस्यीय खंडपीठाने ऍमेझॉनची बाजू योग्य असल्याचे सांगून फ्युचर समूह आणि रिलायन्स इंडस्ट्रीज दरम्यानचा व्यवहार अयोग्य असल्याचे सांगितले होते. आता हे प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे गेले आहे. त्यामुळे फ्युचर रिटेल कंपनीच्या शेअरच्या भावात गेल्या आठवड्यापासून मोठे चढ-उतार झाले आहेत.