भविष्यातील वाढते खर्च आणि गुंतवणुकीची सवय (भाग-२)

भविष्यातील वाढते खर्च आणि गुंतवणुकीची सवय (भाग-१)

जसजसा काळ पुढे सरकत आहे तसतसे नवनवीन गुंतवणूक कल्पना अस्तित्वात येत आहेत. एकरकमी गुंतवणूक, एसआयपी – सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, एसटीपी – सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन, एसडब्लूपी – सिस्टिमॅटिक विथड्रॉल प्लॅन, फ्लेक्स एसआयपी – फ्लेक्झिबल सिस्टिमॅटिक इन्वहेस्टमेंट प्लॅन. अशा अनेक प्रकारच्या गुंतवणूक साधने निर्माण झालेल्या आहेत. किमान गुंतवणुकीची रक्कम ही  देखील रू. शंभर पर्यंत खाली आणली आहे.

अत्यंत पारदर्शक पद्धतीने गुंतवणुकीचे नियोजन, पर्यायांची निवड अशा म्युच्युअल फंडांच्या योजनांमध्ये केली जाते. बाजारात चढउताराचा फायदा प्रत्येक गुंतवणूकदाराला मिळत असतो आणि तो थेट त्याच्या गुंतवणुकीमध्ये परावर्तित होतो. या सर्व प्रक्रियेमध्ये गुंतवणूकदार व म्युच्युअल फंडांच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणजे आर्थिक सल्लागार असतो. प्रत्येक गुंतवणूकदाराची नेमकी काय गरज आहे,  त्याच्याकडे भविष्यात कशाप्रकारे पैशांची उपलब्धता असणार आहे, येणाऱ्या काळात स्वतःच्या व कुटुंबाच्या नेमक्या काय गरजा आहेत व त्यासाठी नेमकी किती रक्कम भविष्यात लागणार आहे या सगळ्याचा सारासार अभ्यास करून योग्य अशा आर्थिक पर्यायाची निवड करण्याची क्षमता आर्थिक सल्लागाराकडे असते.

अनेकवेळा गुंतवणूकदार स्वतःच्या कष्टाने कमावलेल्या पैशांची गुंतवणूक स्वतःच्या माहिती असलेल्या पारंपारिक पर्यायांमध्ये गुंतवणूक करत राहतो. परंतु यासाठीचे जे अद्ययावत ज्ञान असायला हवे ते नसल्याने निवडलेला आर्थिक पर्याय भविष्यातील गरजा पूर्ण करू शकत नाही व त्यावेळी गुंतवणूकदाराची आर्थिक अडचण निर्माण होते. म्हणूनच म्हटले जाते की, कष्टाने कमावलेल्या पैशावर वेगवेगळे प्रयोग करणे अनेकवेळा घातक ठरू शकते. यासाठी तज्ञ आर्थिक सल्लागाराची मदत घेतल्यास प्रत्येक गुंतवणूकदारास आपले आर्थिक उद्दीष्ट साध्य करणे सहजरित्या शक्य होते. प्रत्येकास योग्य मार्गदर्शकाची कायम गरज असते आणि ही गरज गुंतवणुकीमध्ये आर्थिक सल्लागार पूर्ण करत असतो.

प्रत्येक गुंतवणुकीसाठी सल्ला जरूरीचा असतो. हे प्रत्येकाने कायम लक्षात ठेवले पाहिजे आणि महत्त्वाचे म्हणजे आपण हा सल्ला कुणाकडून घेत आहोत हे देखील अतिशय महत्त्वाचे आहे. कारण आपले मित्र, नातेवाईक, माध्यमे, टीव्ही इत्यादी प्रकारातून माहितीचा भरमसाठ पूर आलेला असतो. यासर्वातून गुंतवणूकदारास नेमके काय उपयोगाचे आहे हे प्रत्येकाने तपासावयास हवे.

या सर्वांमध्ये अनुभवी तज्ञ आर्थिक सल्लागार गुंतवणूकदाराची योग्य माहिती देऊन मदतच करत असतो. आपण आपला आर्थिक सल्लागार निवडताना योग्य निकष लावणे गरजेचे आहे. आज भारतामध्ये तज्ञ आर्थिक सल्लागारांची मोठी गरज निर्माण झाली आहे. कारण काळानुसार प्रत्येकाचे आर्थिक उत्पन्न वाढत आहे तसेच त्याच्या भविष्यातील गरजाही वेगळ्या पद्धतीने वाढत आहेत. त्यासाठी आर्थिक मार्गदर्शकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)