पुणे – मागील पाच वर्षांत कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्यांसाठी आमदार सुनील कांबळे यांनी केलेले काम कौतुकास्पद असून, कांबळे हे अतिशय उत्तम व्यक्ती आहेत. त्यांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल असून, ते पुन्हा या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त करत कांबळे यांचे कौतुक केले.
भाजपा महायुतीचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार कांबळे यांच्या प्रचारार्थ गोळीबार मैदान येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. माजी मंत्री दिलीप कांबळे, राज्यसभा सदस्य डॉ. मेधा कुलकर्णी, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, आरपीआय आठवले गटाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, श्रीनाथ भिमाले, अर्चना पाटील, सुशांत निगडे, महेश पुंडे, विवेक यादव, प्रियंका श्रीगिरी यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. मागील काही महिन्यांपूर्वी येथे आणि हरियाणामध्ये लोकसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत एनडीए सरकारला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, विधानसभा निवडणुकीत हरियाणामध्ये एनडीए सरकारला लोकांनी पसंती दर्शवली आहे. अन् तोच इतिहास महाराष्ट्रातही घडेल. महायुतीची सत्ता येईल, असा मला विश्वास आहे.
आमदार कांबळे म्हणाले, महायुती सरकारने आजवर केलेले काम आणि विकासाचा मुद्दा घेऊन आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत. मी मागील पाच वर्षांत सर्वसामान्यांचे आरोग्य, त्यांच्यासाठी पायाभूत सुविधा, मतदारसंघाचा विकास यासाठी काम केले असून, मतदारांवर माझा विश्वास आहे. त्यामुळे मतदार आपल्या पाठीशी उभे राहतील. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माजी उपाध्यक्षा डॉ. किरण मंत्री यांनी आभार मानले.