नवी दिल्ली: बोईंग या अमेरिकी कंपनीने सर्व 37 अपाचे आणि चिनूक हेलिकॉप्टर्स भारतीय हवाई दलाकडे (आयएएफ) प्रदान केली आहेत. भारत-चीन सीमेवर तणावाची स्थिती निर्माण झाल्याच्या काळात घडलेल्या त्या महत्वपूर्ण घडामोडीमुळे आयएएफचे बळ आणखी वाढले आहे.
भारताने सप्टेंबर 2015 मध्ये बोईंगशी अब्जावधी डॉलर्सचा करार केला. त्यानुसार हवाई दलासाठी 22 अपाचे अटॅक हेलिकॉप्टर्स आणि 15 चिनूक हेलिकॉप्टर्सची खरेदी निश्चित झाली. ती हेलिकॉप्टर्स टप्प्याटप्प्याने हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाली.
अखेरच्या 5 अपाचे हेलिकॉप्टर्सची डिलिव्हरी बोईंगने सुमारे दोन आठवड्यांपूर्वी केली. सर्व हेलिकॉप्टर्स प्रदान केल्यानंतर बोईंगने भारतीय सशस्त्र दलांच्या गरजा पूर्ण करण्यास वचनबद्ध असल्याची ग्वाही दिली. त्यामुळे भारत आणि अमेरिकेतील संरक्षणविषयक भागीदारी नव्या उंचीवर पोहचल्याच्या बाबीवर शिक्कामोर्तब झाले.
भारताने बोईंगकडून खरेदी केलेल्या अपाचे हेलिकॉप्टर्समध्ये जगातील सर्वांत आधुनिक मानल्या जाणाऱ्या एएच-64ई या प्रकाराचाही समावेश आहे. त्याचा वापर अमेरिकी लष्कराकडून केला जातो. अपाचे हेलिकॉप्टर्सची निवड करणाऱ्या जगातील मोजक्या 17 देशांमध्ये भारताचा समावेश आहे. त्याशिवाय, जगातील 20 संरक्षण दलांनी चिनूकला पसंती दिली आहे.
अपाचे आणि चिनूकमध्ये अनेक अत्याधुनिक प्रणालींचा समावेश आहे. अपाचे दिवसाप्रमाणेच रात्रीही लक्ष्याची माहिती मिळवू शकते. सागरी वातावरणात त्यामधील आग नियंत्रण रडार कार्य करू शकते. तर चिनूक आव्हानात्मक स्थितीतही कार्य करू शकते.
अत्याधुनिक अपाचे आणि चिनूक हेलिकॉप्टर्समुळे भारतीय हवाई दलाच्या क्षमतेत अनेक पटींनी वाढ झाली आहे.
चीनी कुरापतींमुळे प्रत्यक्ष ताबा रेषेच्या (एलएसी) लगत भारतीय हवाई दलाने आपली तैनाती याआधीच वाढवली. त्याअंतर्गत अपाचे आणि चिनूक हेलिकॉप्टर्स एलएसीलगतच्या आणि प्रामुख्याने पूर्व लडाख विभागातील महत्वाच्या हवाई तळांवर सज्ज ठेवण्यात आली आहेत.