मुंबई – अमेरिकेने व्याजदरात वाढ जाहीर केल्यापासून आणि रशिया -युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून भारताच्या परकीय गंगाजळीते वेगाने घट होत असल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच संपलेल्या आठवड्यात भारतातील परकीय चलन साठा 11 अब्ज डॉलरने कमी होऊन 606 अब्ज डॉलरवर आला आहे.
या अगोदरच्या आठवड्यामध्ये हा साठा दोन अब्ज डॉलरने कमी होऊन 617 अब्ज डॉलरवर गेला होता. अमेरिकेने केलेली व्याजदर वाढ आणि युद्धामुळे रुपयाचे मूल्य वेगाने कमी होत असल्यामुळे आणि भारताला आयातीसाठी मोठ्या प्रमाणात डॉलर मोजावे लागत असल्यामुळे भारताकडील डॉलरचा साठा कमी होत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.
घसरणाऱ्या रुपयाचे मूल्य स्थिर करण्यासाठी अनेक वेळा रिझर्व्ह बॅंकेला डॉलर विकावे लागतात. त्यामुळेही भारताच्या चलन साठ्यावर परिणाम झाला असल्याचे दिसून येते. भारतीय रिझर्व बॅंकेकडे सध्या 42 अब्ज डॉलरचे सोने असल्याचे समजले जाते. या सोन्याच्या मुल्यावरही काही प्रमाणात परिणाम झाला आहे.