फुरसुंगी – मंतरवाडी ते खडी मशीन चौकादरम्यानच्या बाह्यवळण रस्त्याच्या दुतर्फा अवजड वाहने उभी केली जात असल्याने रस्ता रूंदीकरणानंतरही हा रस्ता अपुरा पडत आहे. हांडेवाडी वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक पदाधिकारी व नागरिकांनी केली आहे.
सोलापूर महामार्गावरून शहरात जाणारी सर्व जड वाहतूक हडपसर-गाडीतळमार्गे-सासवडमार्गे वळवून मंतरवाडी चौकातून कात्रज बाह्यवळण मार्गावर वळविल्याने या मार्गावर क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक होत आहे.
हा रस्ता हांडेवाडी, उंड्री, पिसोळी या दाट लोकवस्ती असलेल्या भागातून जातो. त्यामुळे या रस्त्यावर अन्य वाहतूकही मोठ्या प्रमाणात असते. हांडेवाडी परिसरात रस्त्याच्या दुतर्फा लोखंडी बार, अँगल-पाइप व बांधकामाचे लोखंड, साहित्य विक्री करणारी मोठी दुकाने, गोदामे आहेत. मात्र, माल उरतवून घेताना अवजड वाहने थांबण्यासाठी अशा दुकान, गोदामांपुढे जागा नसल्याने अवजड वाहने रस्त्यावर कोठेही थांबविली जातात.
रात्री-अपरात्री अशी वाहने येथे येत असून ती धोकादायकरित्या उभी केली जात असल्याने यातून अनेक गंभीर अपघात घडले आहेत. याला ट्रकचालकांसह संबंधित दुकानदार, व्यावसायिकही जबाबदार आहेत, त्यामुळे ट्रकचालकांसह संबंधित व्यावसायिकांवरही कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
वजनकाट्यांवरील गर्दीची भर…
मंतरवाडी चौकातून कात्रज बाह्यवळण मार्गावर अनेक ठिकाणी वजनकाटे असून ते ही अगदी रस्त्यालगतच आहेत.त्यामुळे वजन करण्यासाठी येणाऱ्या अवजड वाहनांच्या येथे लांबच लांब रांगा लागतात. वजनकाटा चालकांचे अशा कामी कुठलेही नियोजन नसते, याउलट रस्त्यावर यातूनही वाहतूक कोंडी होत आहे.