“फणी’ चक्रिवादळ अतितीव्र बनण्याचा इशारा

नवी दिल्ली – बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तयार झालेले “फणी’ हे चक्रिवादळ सोमवारी रात्री तीव्र आणि मंगळवारी “अति तीव्र’ बनू शकते, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. त्यामुळे सरकारने “एनडीआरएफ’ आणि तटरक्षक दलाला “हाय अलर्ट’दिला आहे.

सध्या “फणी’ हे चक्रिवादळ चेन्नईच्या नैऋत्येकडे 880 किलोमीटरवर आहे. या वादळाची गती पाहता 6 तासातच तीव्र चक्रिवादळामध्ये आणि पुढच्या 24 तासात अतितीव्र चक्रिवादळामध्ये रुपांतरीत होईल. 1 मे च्या संध्याकाळपर्यंत नैऋत्येच्यादिशेने सरकेल आणि त्यानंतर पुन्हा उत्तर ईशान्येकडे सरकेल. तसेच गुरुवारपर्यंत या वादळाचे रुपांतर अतितीव्र चक्रिवादळामध्ये झलेले असेल, असे “आयएमडी’च्या वृत्तामध्ये म्हटले आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कमिटीने या इशाऱ्याची तातडीने दखल घेतली असून “फणी’मुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीच्या व्यवस्थापनासाठी आज बैठक घेतली. या चक्रिवादळाचा फटका बसू शकणाऱ्या सर्व संबंधित राज्यांनाही हा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्य सचिवांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या बैठकीत भाग घेतला.

“एनडीआरएफ’ आणि “कोस्टगार्ड’लाही हाय अलर्ट देण्यात आला आहे. या चक्रिवादळामुळे समुद्र खवळलेला असणार असल्याने मच्छिमारांनीही समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंध्रची उत्तर किनारपट्टी आणि ओडिशाच्या दक्षिण किनाऱ्यावर गुरुवारी मुसळधार पावसाचीही शक्‍यता आहे. या भागात ताशी 170-180 किलोमीटर वेगाने वारे वाहयाची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.