मंचर उपजिल्हा रुग्णालयात खळबळ : जिल्ह्यतील रुग्णालयांमधील सलाईनच्या पिशव्या तपासणीचे आदेश
मंचर-येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या सलाईनमध्ये शेवाळसदृश्य बुरशी आढळल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी (दि. 30) सकाळी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे सलाईनमध्ये शेवाळसदृश्य बुरशी असलेली पिशवी बाजुला ठेवुन हा प्रकार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर यांना दिली असून जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये आणि ग्रामीण रुग्णालयातील सलाईनच्या पिशव्याची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालयासाठी सलाईनचा पुरवठा ठेकेदारांमार्फत केला जातो. मंचर उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिका रुग्णांना सलाईन लावण्यास गेल्या असता सलाईनच्या पिशवीमध्ये काहीतरी खराब असल्याचे दिसून आले. त्यानुसार परिचारिकांनी मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय संपत केदारे यांच्याकडे सलाईनची पिशवी दिली. डॉ. संपत केदारे यांनी पिशवीचे निरिक्षण केले असता त्यामध्ये शेवाळसदृश्य बुरशी दिसून आली.
सलाईन पिशवीची अंतिम मुदत मे 2020 असून सलाईन पिशवी बॅच नंबर 1807017104 आहे. या सलाईनची पिशवी रुग्णांना न वापरता बाजुला ठेवण्यात आली आहे. तसेच स्टॉकमध्ये असलेल्या सलाईन पिशव्यांची पडताळणी करण्यात येत आहे.
- सर्व रुग्णालयांना सलाईन पिशव्यांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व सलाईन पिशव्याचंची पडताळणी करण्यात येणार आहे. येथील सलाईनमध्ये सापडलेल्या शेवाळाची गंभीरतेने दखल घेऊन वरीष्ठांना याबाबत अहवाल पाठविणार आहे.
– डॉ. संपत केदारे, वैद्यकीय अधिकारी, मंचर उपजिल्हा रुग्णालय