बारामती : डिसेंबरच्या सुरवातीलाच सुटलेल्या गुलाबी थंडीने शेतकरी सुखावलेला असतानाच ऐन वेळी रविवार (दि.१) पासून ढगाळ हवामान निर्माण झाले आहे. त्यामुळे भाजीपाला, धान्य, फळबागांवर बुरशीजन्य रोगाची टांगती तलवार दिसू लागली आहे. त्यामुळे बळीराजाच्या जीवाला घोर लागला आहे.
शुक्रवारी (दि.२९) हिवाळ्यातील सर्वात थंड दिवस अनुभवला गेला. यावेळी ९ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान घसरले. त्यामुळे ऊस, गव्हासारख्या पिकासाठी पोषक वातावरण निर्माण झाले. मात्र, निसर्गाने पुन्हा संधी हिरावली. मागील आठवड्यात ८ ते १० अंश सेल्सिअसवर असणाऱ्या तापमानात आठवड्यात वाढ नाेंदविली. ढगाळ हवामानामुळे हे तापमान सध्या १३ ते १७ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. त्यामुळे पिकांवर बुरशीजन्य रोग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. तापमानातील हा बदल तीन दिवस कायम राहण्याची शक्यता बारामती येथील कृषी विज्ञान केेंद्राने वर्तविली आहे. शेतकऱ्यांनी आवश्यक दक्षता घेत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे आवाहन केले आहे.
कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ संतोष करंजे म्हणाले की, भाजीपाला, गहू, हरभरा, द्राक्ष, डाळींब पिकांना हवामानातील झालेला बदल हानीकारक आहे. वाढती थंडी ऊस पिकाला अनुकुल आहे. त्यामुळे साखर उतारा वाढीला पोषक वातावरण निर्माण होते. मात्र, तापमानात बदल झाल्यास, वाढ झाल्यास साखर उताऱ्यावर विपरित परिणाम होतो. सध्या उसावर अधिक प्रमाणात तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. त्यामुळे ऊस पिकाच्या पानातील क्लोरोफिल कमी होते. या रोगाची लक्षणे दिसताक्षणीच आवश्यक औषध फवारणी करावी, असे करंजे यांनी आवाहन केले.