मयत नोंद न होताच अंत्यसंस्कार

विठ्ठलवाडी स्मशानभूमीतील प्रकार : रात्रीच्या वेळेत सेवकच नाही

पुणे – महापालिका प्रशासनाच्या अनागोंदीचा आणखी एक धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या विठ्ठलवाडी येथील स्माशनभूमीत रात्रीच्या वेळी कर्मचारी तसेच सुरक्षा रक्षक नसल्याने या स्माशनभूमीच्या रेकॉर्डमध्ये मृत्यूच्या माहितीची कोणतीही नोंद न करता एका व्यक्‍तीवर अंत्यसंस्कार झाले आहेत. ही बाब अतिशय गंभीर असून या बाबीचा गैरफायदा काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्‍तिंकडून केला जाण्याची भीती व्यक्‍त होत आहे.

शहरात एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर या नागरिकाच्या अंत्यविधीसाठी महापालिकेच्या जन्म-मृत्यू कार्यालयाचा मयतपास घ्यावा लागतो. त्यासाठीची सुविधा रात्रीच्या वेळी ससून रुग्णालय तसेच आणखी एका ठिकाणीच आहे. अनेकदा नागरिकांना याबाबत माहिती नसते. तर हा पास नसल्यास पालिकेच्या कोणत्याही मयत व्यक्‍तीवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करता येत नाहीत. वडगाव येथील एका वृद्ध महिलेचे निधन झाले. त्यानंतर ही माहिती नातेवाईकांकडून पालिकेच्या रुग्णालयात कळविण्यात आली. त्यानंतर त्यांना स्मशान परवाना देण्यात आला. हा परवाना घेऊन ते विठ्ठलवाडी स्मशानभूमीत आले. या ठिकाणी नातेवाईकांकडून मयत पास घेण्यासाठी तसेच स्मशान परवाना देण्यासाठी पालिका कर्मचाऱ्याचा शोध घेण्यात आला.

मात्र, त्या ठिकाणी कोणीच नव्हते. त्यामुळे मयत वार्ताचा फॉर्म आपल्या जवळच ठेवत नातेवाईकांकडून अंत्यसंस्कारही उरकण्यात आले. मात्र, आता या अंत्यसंस्काराची नोंदच पालिकेच्या रेकॉर्डवर नाही. तसेच त्यांच्याकडे स्मशानभूमीकडून मिळणारी नोंदची पावतीही नाही. त्यामुळे गुरुवारी सकाळी नातेवाईकांनी मृत्यू दाखल्यासाठी कुठे नोंद करायची म्हणून चौकशी केली. यावेळी त्यांना अनेकांनी स्मशानभूमीत पासबाबत विचारणा केली. मात्र, त्यांनी हा पासच मिळाला नसल्याचे सांगितले. त्यामुळे अडचणीत आलेल्या नातेवाईकांनी स्थानिक नगरसेविका मंजूषा नागपूरे यांच्याशी संपर्क साधत या प्रकाराची माहिती दिली आहे.

हे प्रकरण गंभीर आहे. याबाबत आठवड्याभरापूर्वीच आपण प्रशासनाकडे सुरक्षारक्षक नाही तर, 24 तास कर्मचारी नेमण्याची मागणी केली होती. मात्र, याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. त्यामुळे स्मशानभूमीच्या रेकॉर्डवर कोणतीही नोंद न होता संबंधित व्यक्‍तीचे अंत्यसंस्कार झाले आहेत. त्यामुळे तातडीने सुरक्षारक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी पुन्हा केली आहे.
– मंजूषा नागपूरे, नगरसेविका

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.