शहीद जवान सुनील शिंदेंवर अंत्यसंस्कार

बदलापूर – भारतीय सैन्यातील जवान सुनील नागनाथ शिंदे यांना लेहमध्ये बचावकार्यादरम्यान वीरमरण आले. शिंदे हे मूळचे ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरचे होते. शहीद सुनील शिंदेंवर बदलापूरच्या मांजर्ली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या हौतात्म्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्‍चात त्यांची आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

सुनील शिंदे हे भारतीय सैन्याच्या अभियांत्रिकी विभागात व्हेहीकल मेकॅनिक म्हणून कार्यरत होते. सध्या लेह परिसरात त्यांची पोस्टिंग होती. जानेवारी महिन्याअखेरीच लेह परिसरात हिमस्खलन झाल्याची घटना घडली होती. यावेळी बचावकार्यासाठी भारतीय सैन्याची मदत घेण्यात आली होती. या बचावकार्यादरम्यान सुनील शिंदे यांच्यासह अन्य काही जवान बेपत्ता झाले होते.

पण बर्फाखाली गाडले गेल्याने त्यांचा शोध लागू शकला नव्हता. अखेर हिमवृष्टी थांबल्यानंतर बर्फ वितळण्यास सुरुवात झाली. त्यावेळी शिंदे आणि इतर जवान हे मृतावस्थेत आढळले. तीन दिवसांपूर्वी त्यांचा मृतदेह सापडला होता. यानंतर भारतीय सैन्याने शिंदे यांच्या कुटुंबियांना त्यांच्या मृत्यूची माहिती दिली.

यानंतर मंगळवारी रात्री उशिरा शहीद सुनील शिंदे यांचे पार्थिव बदलापूरच्या घरी आणण्यात आले. त्यांचे कुटुंबिय आणि परिसरातील लोकांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर रात्री 3 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी एक सैन्य अधिकारी आणि सात पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना मानवंदना दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.