सीतेच्या अग्निपरीक्षेप्रमाणेच हाथरस पीडितेवर अंत्यसंस्कार

ममता बॅनर्जी यांची उत्तर प्रदेश सरकारवर टीका

Madhuvan

जलपायगुडी/कोलकाता – ‘ज्याप्रमाणे रामायणात सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली होती त्याचप्रमाणे हाथरसच्या बलात्कार पीडितेच्या मृतदेहाला चितेवर चढवण्यात आले’ अशा शब्दात पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर उपहासात्मक टीका केली आहे.

हाथरसच्या बलात्कार पीडितेचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाल्यावर पोलिसांकडून घाईघाईने या पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार उरकण्यात आले होते. त्या संदर्भाने त्या बोलत होत्या.

उत्तर प्रदेश पोलिसांनी हे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले, त्यावर त्यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले.
‘रामायणामध्ये सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. आता उत्तर प्रदेशात बलात्कार झाल्यानंतर मरण पावलेल्या महिलेच्या मृतदेहाला तशाच प्रकारे चितेवर चढवले गेले.’ असे बॅनर्जी म्हणाल्या.

गुन्हा झाल्यावर 72 तासांच्या आत कारवाई केली गेली पाहिजे. मात्र, आरोपींवर कोणत्याही कारवाईला सुरुवात न करता, पीडित महिलेच्या मृतदेहावर रात्रीच्यावेळी कोणाच्याही अनुपस्थितीत अंत्यसंस्कार कसा केला, असा सवाल त्यांनी विचारला. काही लोक एक गोष्ट बोलतात आणि दुसरेच करतात, असे म्हणून त्यांनी भाजपवर खोचक टीका केली.

मुलीच्याच चितेबरोबर अंत्यसंस्कार करण्याची धमकी संबंधित पीडित युवतीच्या आईला दिली गेली असल्याचा आरोपही बॅनर्जी यांनी केला.

हाथरसच्या सामूहिक बलात्कार आणि हत्येची निंदा करण्यासाठी आपल्याजवळ शब्दच नाहीत. बळजबरीने करण्यात आलेले अंत्यसंस्कार ही त्याहूनही लज्जास्पद बाब आहे, असेही बॅनर्जी ट्विटरवर म्हणाल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.