शौर्य चक्र विजेत्यावर अखेर अंत्यसंस्कार; कुटूंबीयांनी दर्शवला होता नकार

अमृतसर – पंजाबमधील शौर्य चक्र विजेते बलविंदरसिंग संधू यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास त्यांच्या कुटूंबीयांनी प्रथम नकार दर्शवला. मात्र, तरन तारन जिल्हा प्रशासनाने हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर कुटूंबीय राजी झाल्याने अखेर संधू यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पंजाबमधील दहशतवादाशी लढा दिल्याबद्दल सन्मानित करण्यात आलेल्या 62 वर्षीय संधू यांची शुक्रवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तरन तारन जिल्ह्यातील त्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. खलिस्तानवादी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याने संधू यांना प्रदीर्घ काळापासून सुरक्षा पुरवण्यात आली होती. मात्र, पोलिसांच्या शिफारसीवरून पंजाब सरकारने वर्षभरापूर्वी त्यांची सुरक्षा मागे घेतली.

दरम्यान, संधू यांच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत अटक होत नाही; तोपर्यंत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका त्यांच्या कुटूंबीयांनी घेतली. सुरक्षा पुरवण्याची मागणीही त्यांच्याकडून करण्यात आली. त्यानंतर त्या कुटूंबीयांच्या सुरक्षेसाठी तातडीने तीन बंदुकधारी पोलीस तैनात करण्यात आले.

संधू कुटूंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचे आश्‍वासनही जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले. प्रशासनाने केलेल्या मनधरणीनंतर संधू यांचे कुटूंबीय अंत्यसंस्कारास राजी झाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.