उंडाळे प्रादेशिक योजनेसाठी निधी मंजूर करावा

मनोहर शिंदे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

कराड  – मलकापूर नगरपरिषदेच्या वतीने उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पुर्न:जिवित करणे, मलकापूर 24 बाय 7 नळ पाणीपुरवठा योजना बळकटीकरण करणे तसेच विशेष रस्ते योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव गुरूवार दि. 19 डिसेंबर रोजी नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आला असल्याची माहिती मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीप्रसंगी आमदार पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस शिवराज मोरे उपस्थित होते.

ते म्हणाले, दिवसेंदिवस नागरीकरण वाढत चालले आहे. भविष्यात 24 बाय 7 नळ पाणी पुरवठा योजना सुरळीत चालावी त्याचबरोबर कोयनावसाहत ग्रामपंचायत हद्दीतील लोकसंख्येचा या योजनेवर पडणारा ताण विचारात घेऊन उंडाळे प्रादेशिक योजनेचे पुर्न:जीवन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेमुळे मलकापूर नगरपरिषद, कोयनावसाहत, जखिणवाडी, नांदलापूर, पाचवडफाटा-मळा, कालेटेक व धोंडेवाडी या गावांनासुध्दा शुध्द पाणीपुरवठा व्हावा याकरीता प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर करण्यात आला.

सदर योजनेची पाहणी तत्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छता सचिव विजयकुमार गोयल यांनी केली होती. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी 6 कोटी 24 लाख रूपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. त्यास मान्यता मिळावी यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा विभागाकडे 21 मे 2019 रोजी सादर केले असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांना सांगण्यात आले.

तसेच 24 बाय 7 नळ पाणीपुरवठा योजना अखंडीत 10 वर्षे सुरळीतपणे सुरु असल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांनी योजनेचे व नगरपरिषद लोकप्रतिनिधी, प्रशासन व नागरिक यांचे कौतुक केले. तसेच याबाबतचे सादरीकरण इतर नगर परिषदांकरीता घेऊ अशी ग्वाही दिली. या योजनेचे बळकटीकरण करण्यासाठी नगरपरिषदेने 7.50 कोटी रक्कमेचा प्रस्ताव तत्कालिन मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता.

परंतु या प्रस्तावावर अंमलबजावणी न झाल्याने पुन:श्‍च सदरचा प्रस्ताव मंजूर करावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. याबरोबरच कराड मलकापूर-नांदलापूर-कोकरुड राज्य महामार्गातील भूसंपाधितांना मलकापूर नगरपरिषदेकडून मोबदला दिला जाणार आहे. शासनाकडून दिल्या जाणाऱ्या रोख स्वरुपाच्या मोबदल्यासाठी आवश्‍यक असणारा 24 कोटी रूपयांचा निधीही तात्काळ मिळावा अशी मागणी करण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.