ग्रेट न्यूज : अखेर मर्ढेकर स्मारकाचे स्वप्न साकार होणार!

स्मारकाच्या लोकार्पण प्रक्रियेसाठी 20 लाखांचा निधी मंजूर

– श्रीनिवास वारुंजीकर

सातारा – मराठी कवितेला एक नवा चेहरा-मोहरा देणारे, मराठी समीक्षेमध्ये नव्या संकल्पना रुजवणारे युगप्रवर्तक कवी बाळ सीताराम अर्थात बा. सी. मर्ढेकर यांच्या मर्ढे, सातारा येथील स्मारकाच्या लोकार्पण प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाने 20 लाख 17 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे या युगप्रवर्तक कवीचे स्मारक सर्वसामान्यांसाठी खुले होण्याचा मार्ग सुकर झाला असून यानिमित्ताने साहित्यिक वर्तुळात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
मर्ढेकर स्मारक समितीचे अध्यक्ष तथा सातारचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी याबाबतचा प्रशासकीय मान्यता आदेश सार्वजनिक केला आहे.

त्यानुसार मर्ढे गावातील भैरवनाथ मंदिर चौकात यापूर्वीच बांधून पूर्ण झालेल्या स्मारकाची दुरुस्ती, सुशोभिकरण तसेच मर्ढेकरांचे तैलचित्र, जीवनपट, त्यांची ग्रंथसंपदा व तदनुषंगिक कामे पूर्ण करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. ही कामे पूर्ण होताच स्मारकाचे लोकार्पण केले जाईल. या स्मारकामध्ये एका ग्रंथालयाचाही समावेश असून अनेक देणगीदारांनी याआधीच ग्रंथसंपदा व पुस्तके ठेवण्यासाठी कपाटे स्मारकाला देणगीस्वरुपात दिली आहेत.

स्मारकाच्या पूर्ततेसाठीचा 20 लाख 17 हजार रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी, लेखाशिर्ष पर्यटन स्थळ विकासासाठी मूलभूत सुविधांकरिता अनुदान याअंतर्गत मंजूर केला असून त्यामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेला स्मारक लोकार्पणाचा प्रश्‍न सुटल्याचे मानले जात आहे.

स्मारकाची वाटचाल…
1. बा. सी. मर्ढेकर यांचे निधन वर्ष 1956 मध्ये दिल्ली येथे झाले. त्यानंतर सातारा येथे वर्ष 1962 मध्ये काकासाहेब गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली 44 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. त्यावेळी अखेरच्या दिवशी संमेलनात असा ठराव करण्यात आला की, मर्ढे, ता. जि. सातारा या मर्ढेकरांच्या मूळ गावी (जन्मगाव फैजपूर-धुळे) मर्ढेकरांचे स्मारक उभारावे. मात्र, शासन दरबारी हा प्रस्ताव दाखलच नव्हता.
2. वर्ष 1993 मध्ये सातारा येथे 66 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले ते विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली. या संमेलनाच्या उर्वरीत निधीमधून त्याच वर्षी पहिले अभिजात साहित्य संमेलन सातारा येथे झाले, ते तत्कालीन आमदार अभयसिंहराजे भोसले यांच्या पुढाकारातून. या संमेलनाचे अध्यक्ष होते समीक्षक आणि मर्ढेकरांच्या साहित्याचे अभ्यासक द. भि. कुलकर्णी. या संमेलनाच्या पहिल्या दिवशी राम शेवाळकर, डॉ. विजया राजाध्यक्ष, कवी अशोक नायगावकर यांच्या उपस्थितीत, पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी गावाच्या हद्दीत मर्ढेकर स्मारकाचे भूमीपूजन झाले. मात्र, नंतर ही जागा महामार्गाच्या रुंदीकरणार संपादित केली गेली.

  1. त्यानंतर अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर वर्ष 2005-06 मध्ये तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने बा. सी. मर्ढेकर स्मारक समिती स्थापन करण्यात आली. या समितीमध्ये डॉ. विजया राजाध्यक्ष, रा. रं बोराडे आणि डॉ. नरेन्द्र दाभोलकर यांच्यासारखे मान्यवर होते. वर्ष 2006 मध्ये मर्ढे गावातील गांधी भवनच्या जागेत मर्ढेकर स्मारकाचे भूमीपूजन करण्यात आले आणि अल्पावधीत कराडचे वास्तुरेखाकार उदयन कुलकर्णी यांच्या आराखड्यानुसार स्मारकाची इमारत उभी राहिली. त्यावेळी साधारण 48 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.

  2. त्यानंतर पुन्हा लोकार्पणाचे काम काही कारणाने रेंगाळले. त्यासाठी वारंवार पाठपुरावा करणारे कवी, पत्रकार श्रीनिवास वारुंजीकर यांनी 1 डिसेंबर 2015 रोजी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले आणि परिणामस्वरुप सातारा जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल यांनी मर्ढेकर स्मारक समितीचे पुनरुज्जीवन केले. त्यानुसार पाच सदस्य आणि उपविभागीय अधिकारी अध्यक्षस्थानी अशी समितीची रचना करण्यात आली. त्यावेळी रविंद्र खेबुडकर, मग स्वाती देशमुख यांच्यासह विद्यमान अध्यक्ष मिनाज मुल्ला यांनी स्मारकाच्या पूर्ततेसाठी मोठे प्रयत्न केले. मर्ढेकर ग्रामस्थ, सरपंच आणि मर्ढेकरांच्या साहित्याचे अभ्यासक यांच्यासह महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सदस्य या समितीचे भाग आहेत. त्यामध्ये रविंद्र बेडकीहाळ, विनोद कुलकर्णी, शरद शिंगटे, ऍड. अरविंद शिंगटे आदींचा समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.