पुणे – दाखल होऊनही केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पीएमपीच्या 107 नवीन बस स्वातंत्र्यदिनी ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यात 50 सीएनजी, तर 57 ई-बसेसचा समावेश आहे.
या बसेसच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मिळत नव्हती. अखेर राज्यातील पूरस्थितीमुळे या कार्यक्रमास येण्यास मुख्यमंत्र्यांनी असमर्थता दर्शविल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच विद्यार्थ्यांच्या हस्ते या बसेसचे लोकर्पण करण्यात येणार आहे. त्यासाठीचे पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महापालिकेचे 2 स्वतंत्र कार्यक्रम होणार आहेत.
दरम्यान, पीएमपीला नव्याने 125 ई बस आणि 154 सीएनजी बसेस मिळणार आहेत. त्यातील सुमारे 50 सीएनजी बस आणि 125 ई-बस शहरात दाखल झाल्या असून 57 ई-बसची आरटीओ नोंदणी पूर्ण झालेली आहे.
दरम्यान, मात्र, आता मुख्यमंत्र्यांनीच वेळ नाकारल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते पुणे महापालिकेच्या नवीन विस्तारित इमारतीसमोर सकाळी 10 वाजता ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या बसेसचे लोकार्पण होणार आहे. तर, पिंपरी-चिंचवड येथे सकाळी 9 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते या बसेसचे लोकार्पण होणार आहे.
प्रवाशांसाठी आता वाढीव बसेस उपलब्ध होणार असून, ई-बस तसेच सीएनजी बसेसमुळे वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यास मदत होणार आहे. दोन्ही महापालिकांनी या बसेसाठी पुढाकार घेत पर्यावरण संवर्धनाचा आदर्श घालून दिला आहे.
– मुक्ता टिळक, महापौर.