पुणे : सध्या नावीन्यतेवर भर देण्यात येत आहे. मात्र त्यासाठी पूरक धोरणे, पुरेसा निधी, जोखीम पत्करण्याची मानसिकता आवश्यक आहे, असे प्रतिपादन नीती आयोगाचे सदस्य डॉ. विजयकुमार सारस्वत यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १२५ व्या पदवी प्रदान सोहळ्यात डॉ. सारस्वत बोलत होते. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे, परीक्षा संचालक डॉ. महेश काकडे या वेळी उपस्थित होते.
डॉ. सारस्वत म्हणाले, नैसर्गिक साधनसंपत्तीचा मानवाने अशाश्वत पद्धतीने उपभोग घेतल्याने हवामान बदलाचे जागतिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या आपत्ती कमी करण्यासाठी योजना आखणे, त्याचे परिणाम कमी करण्यावर शास्त्रज्ञांनी लक्ष दिले पाहिजे. त्यात पुनर्वापरायोग्य ऊर्जास्रोतांचा वापर, हरितवायूंचे उत्सर्जन कमी करणे, हवामान लवचिक पायाभूत सुविधा उभारणे यांचा समावेश असू शकतो.
भविष्यातील ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण शाश्वततेसाठी भारताने आता स्वच्छ आणि किफायतशीर ऊर्जा तंत्रज्ञान, शाश्वत औद्योगिक कार्यपद्धती आणि पर्यावरणपूरक दळणवळण व्यवस्था उभारण्यास प्राधान्य दिले पाहिजे. याबाबत व्यक्ती आणि समाजाला शिक्षण, माहिती, संज्ञापन आणि पर्यावरण शाश्वततेच्या माध्यमातून सक्षम करता येऊ शकते. नावीन्यतेद्वारे समाज, अर्थव्यवस्था, जीवनमान यात परिवर्तन घडवता येऊ शकते, असेही ते म्हणाले.
डॉ. गोसावी यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी केला पाहिजे, असे डॉ. गोसावी यांनी सांगितले.
चौकटीबाहेरचा विचार आवश्यक
सध्याच्या काळात विविध क्षेत्रांत अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे समस्या समजून घेऊन चौकटीबाहेर जाऊन विचार करण्याची गरज आहे. समस्या सोडविण्यासाठी एकात्मिक विज्ञानाचा दृष्टिकोन गरजेचा आहे. नव्या आर्थिक संधी निर्माण होत असताना कुशल मनुष्यबळासाठी शिक्षण, प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधांसाठी मोठी गुंतवणूक गरजेची आहे, असे मत डाॅ. सारस्वत यांनी व्यक्त केले.