येरवड्यात नवीन कारागृहासाठी निधी देऊ

आढावा बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

पुणे -मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहातील कैद्यांची गर्दी कमी करण्यासाठी मुंबईतील चेंबूर परिसरात अमेरिकेतील शिकागोच्या धर्तीवर बहुमजली कारागृह इमारत लवकरच बांधण्यात येईल. त्याचसोबत पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाकडील जागेवर नवीन कारागृह बांधण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे ज्याप्रमाणे पुरुष बंदीसाठी खुली वसाहत आहे. त्याप्रमाणे महिला बंदीसाठी खुली वसाहत निर्माण करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहास शनिवारी त्यांनी भेट देत कारागृह प्रशासानाचा आढावा घेतला त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पोलीस महासंचालक संजय पांडे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद, उपमहानिरीक्षक योगेश देसाई, कारागृह अधीक्षक यु.टी.पवार उपस्थित होते. यावेळी गृहमंत्री यांचे हस्ते – सांख्यिकी पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.

वळसे पाटील म्हणाले की, महाराष्ट्र कारागृह विभागाचे मुख्यालय सध्या पुणे येथील जुनी मध्यवर्ती इमारत येथून हलवून ते येरवडा मध्यवर्ती कारागृहाकडील असणाऱ्या जागेवर नवीन कारागृह मुख्यालयाची इमारत बांधण्यात येईल त्याठिकाणी स्थलांतरित करण्यात येईल.

बंदींना न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीसाठी हजर करण्याकरिता सीआरपीसीमध्ये दुरुस्ती करण्यात येईल. जेणेकरुन जास्तीत जास्त प्रमाणात व्हीसीचा वापर करून बंद्यांचा वेळ वाचेल त्याचसोबत पोलिसांवरील ताण कमी होईल. न्यायप्रक्रिया जलद होऊन व शासनाचे बंदी न्यायालयात ने-आण करण्यासाठीचे पैसे व पोलीस मनुष्यबळ वाचू शकेल.

शिक्षण पूर्ण तर काही दिवसांची शिक्षा माफ…
कारागृहाचे अपर पोलीस महासंचालक यांनी कारागृह विभागाचे सादरीकरण करताना सांगितले, कारागृहात असताना कैद्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले तर त्यांना शिक्षेतून काही दिवसांची विशेष माफी देण्यात येते. कोविडच्या कालावधीत राज्यातील कारागृहांनी मोठया प्रमाणावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर करून बंदींना न्यायालयात उपस्थित केले. कारागृहातील करोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी कारागृह प्रशासनाने ज्या उपाययोजना केल्या आहे त्याची प्रशंसा उच्च न्यायालयानेही केली आहे. कोविडमुळे मृत्यू झालेल्या आठ कारागृह अधिकारी व कर्मचारी यांचे कुटुंबीयांना लाखांची आर्थिक मदत शासनाकडून मंजूूर झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.