ईडीच्या अहवालातील माहिती:अहवाल गृहमंत्रालयास सादर
नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) देशभरात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी केरळमधील कट्टर मुस्लीम संघटना पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडियाकडून (पीएफआय) आर्थिक सहाय्य करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. 6 जानेवारी 2020 पर्यंत झालेल्या आंदोलनांसाठी ही आर्थिक मदत पुरवण्यात आली. एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) गृहमंत्रालयाकडे यासंबंधी अहवाल सादर करण्यात आला आहे. 2018 मधील मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात पीएफआयच्या भूमिकेसंबंधी तपास सुरु असताना ही माहिती समोर आल्याचे ईडीमधील सुत्रांनी सांगितले आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएफआयशी संबंधित खात्यांमध्ये 120.5 कोटींची रक्कम वळवण्यात आल्याचे ईडीच्या तपासात समोर आले. तसेच या बॅंक खात्यांमधून पैसे जमा करण्याच्या आणि काढण्याच्या तारखा या देशभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये सीएएविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनांशी जुळत आहेत.
दिल्लीमधील नेहरु प्लेस येथील सिंडीकेट बॅंकेतील पीएफआयच्या खात्यातून मोठी रक्कम उत्तर प्रदेशातील बहारीन, बिजनोर, शामली, दासना येथील खात्यांमध्ये पाठवण्यात आल्याचे ईडीने आपल्या अहवालात म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रसिद्ध वकील कपिल सिब्बल, इंदिरा जयसिंग आणि दुष्यंत ए यांनाही पैसे देण्यात आल्याचे ईडीने सांगितले आहे. यामध्ये अब्दुल समद याचेही नाव आहे. अब्दुल एका दहशतवाद प्रकरणातील आरोपी आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) फेब्रुवारी 2018 मध्ये त्याला अटक केली होती.