कचेश्‍वर देवस्थानच्या दुरुस्तीसाठी निधी द्या : आ. काळे

कोपरगाव  – शहरातील बेट भागातील दैत्यगुरू शुक्राचार्य व कचेश्‍वर देवस्थान हे अतिप्राचीन देवस्थान आहे. 1 नोव्हेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील या मंदिराच्या दक्षिणेकडील जवळपास 150 फूट लांबीची भिंत कोसळली आहे. त्यामुळे मंदिराच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी द्यावा, अशी मागणी पुरातत्व विभागाला दिलेल्या पत्रात आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे.
पत्रात आ. काळे यांनी म्हटले आहे की, दैत्यगुरू शुक्राचार्य व त्यांची मुलगी देवयानी यांची ख्याती संपूर्ण देशभर आहे. या दैत्यगुरू शुक्राचार्यांचे कोपरगाव शहराच्या बेट भागात अतिप्राचीन मंदिर आहे. वर्षभर या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी श्रावण महिना, महाशिवरात्र या पुण्य काळात भाविकांची मांदीयाळी असते. मात्र काही वर्षांपासून या तीर्थक्षेत्राकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळे या मंदिराची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. काही वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत या देवस्थानच्या पूर्वेकडील दरवाजाची बाजू पूर्णपणे पडलेली असून, अतिवृष्टीमुळे या देवस्थानच्या दक्षिणेकडील भिंत कोसळल्यामुळे मंदिरास मोठा धोका निर्माण झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.