पिंपरी -करोना महामारीमुळे मागील दोन वर्षांपासून प्राथमिक व माध्यमिकच्या शाळा काही काळ पूर्णतः बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यात मागील काही दिवसांपूर्वी अर्धवेळ शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. परंतु सध्या करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने सोमवार (दि. 7) पासून पहिले ते आठवीचे वर्ग पूर्णवेळ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी शहरातील सर्व पहिली ते आठवीच्या शाळांना सोमवारपासून पूर्ण वेळ शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी महापालिका हद्दीतील प्राथमिक व माध्यमिकचे वर्ग अर्धवेळ सुरू करण्यात आले होते. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी शाळेत येण्यास सुरुवात केली होती. परंतु करोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने राज्य शासनाच्या निर्णयानुसार महापालिका आयुक्तांनी शहरातील शाळा देखील पूर्ण वेळ सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मागील काही दिवसांपासून पालक, विद्यार्थी शाळा सुरू करण्याची मागणी करत होते. त्यानुसार आता शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु शासनाने करोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन करणे विद्यार्थी व शिक्षकांवर बंधनकारक आहे.
खासगी शिकवणी 50 टक्के क्षमतेने राहणार सुरू
पिंपरी चिंचवड शहरात खासगी कोचिंग क्लासची संख्या देखील मोठी आहे. मागील दोन वर्षांपासून कोचिंग क्लासवाल्यांना देखील मोठ्या प्रमाणावर आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला होता. परंतु या आदेशाने कोचिंग क्लासचालकांना दिलासा मिळाला आहे. कोचिंग क्लास, स्पर्धा परीक्षा क्लास चालकांनी आपल्या हॉलच्या आसन क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीत क्लास घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु त्यासाठी क्लासचालक, प्रशिक्षक व कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण केलेले असणे बंधनकारक आहे.