पुणे/औंध- पुणे महानगरपालिका, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बाणेर-बालेवाडी भागात अनेक प्रकल्पांची कामे पूर्ण झालेली आहेत. परंतु, केवळ उद्घाटनाच्या कारणास्तव सदर समाजोपयोगी प्रकल्प नागरिकांसाठी खुले करण्यात आलेले नाहीत. याबाबत नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांनी महापौरांना निवेदन दिले आहे.
बाणेर-बालेवाडीत महानगरपालिकेचे बहुतांशी प्रकल्प पूर्ण झालेले आहेत तर काही प्रकल्पाचे काम 80 टक्के झाले आहे. महिला जिम, ऑममेन्टेड रिऍलिटी पार्क, कम्युनिटी फार्मिंग, सायन्स पार्क, बुक झोनिया, स्मार्ट सिटी क्लिनिक-बालेवाडी स्विमिंग पूल हे प्रकल्प जवळपास पूर्ण झाले आहेत. एखाद दुसऱ्या प्रकल्पाचे फायनल फिनिशिंगचे काम बाकी आहे, तरीही पूर्ण झालेले प्रकल्प त्वरित नागरिकांसाठी सुरू करण्यात यावेत व त्याचा नागरिकांना लाभ घेता यावा, असे लेखी निवेदन नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांना दिले आहे. त्यामुळे सदर पूर्ण झालेले प्रकल्प खुले होतील, अशी आशा नागरिकांना आहे.
बाणेर-बालेवाडीतील पूर्ण झालेले समजोपयोगी प्रकल्पांची पाहणी करून ते नागरिकांसाठी तातडीने खुले करावेत, यासंदर्भात योग्य ती कार्यवाही तातडीने करावी. असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
– मुरलीधर मोहोळ, महापौर
प्रभाग क्रमांक 9 मधील स्मार्ट सिटीतील पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे उद्घाटन करून नागरिकांना त्याचा लाभ मिळावा, अशा सूचना स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत. सर्व प्रकल्पांचे उद्घाटन लवकर करण्यात यावे, असे लेखी पत्र आयुक्त, महापौर, स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांना दिले आहे.
– ज्योती गणेश कळमकर, नगरसेविका