पुणे – महापालिकेवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर पालिकेत समाविष्ट गावांच्या समस्यांबाबत विशेषत: वाघोली परिसरासाठी प्रशासक विक्रम कुमार यांच्याकडून संपूर्ण सहकार्य मिळत आहे. वाघोलीतील प्रस्तावित कामांना निधी मंजुरीसह ती लवकरात लवकर सुरू करतानाच वाघोली येथील स्मशानभूमी येथे इलेक्ट्रिक शवदाहिनी बसविण्याबाबतही त्यांनी सकारात्मता दर्शविली आहे, असे जि.प.सदस्य तथा “उद्धव बाळसाहेब ठाकरे शिवसेना’ जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर कटके यांनी सांगितले.
पुणे महापालिकेत आज आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांच्यासह उपायुक्त खैरनार तसेच संबंधीत विभागाचे अधिकारी यांची विशेष बैठक झाली. यामध्ये वाघोली परिसरातील समस्या तसेच त्या सोडविण्याबाबत चर्चा झाली. याविषयी ज्ञानेश्वर कटके यांनी सांगितले की, महापालिकेत समावेश झाल्यानंतर प्रशासक आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे वाघोलीतील मुख्य समस्या सर्वात प्रथम मांडल्या आहेत. वाघोली विकास आराखड्याची प्रतही देण्यात आलेली आहे, त्यानुसार सातत्याने पाठपुरावाही होत आहे.
कटके म्हणाले की, आजही वाघोलीतील विविध मुद्यांवर आयुक्त तथा प्रशासकांशी सविस्तर चर्चा झाली. वाघोलीसाठीच्या प्रस्तावित 300 कोटीच्या पाणी योजनेची अंमलबजावणी तातडीने व्हावी तसेच गतअर्धसंकल्पात ठरल्याप्रमाणे वाघोलीतील ड्रेनेजलाईनसाठीचा निधी मंजूर आणि वितरीत करण्यासह काम सुरू करावे, पावसाळ्यात ड्रेनेज व पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने मोठ्या व्यासाच्या पाईपलाईन टाकणे तसेच वाघोलीमध्ये मुख्य रस्त्याचे रेंगाळलेले रूंदीकरण वेगाने होण्यासह अंतर्गत शासकीय मालकीचे बंद रस्ते तसेच काही ठिकाणी खासगी बंद करण्यात आलेले रस्ते खुले करण्याबाबतचा मुद्दा प्रशासक विक्रम कुमार यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. याबाबत त्यांनी तातडीने संबंधीत विभागातील अधिकाऱ्यांना पाहणी करणे तसेच अहवाल देण्याबाबत सूचीत केले असून सदर कामे तातडीने मार्गी लागतील, असे आश्वासन त्यांनी दिले असल्याचेही कटके यांनी सांगितले.
क्रीडांगणेही उभारावीत –
वाघोली येथे क्रीडांगणासाठी जागा आरक्षित आहेत. परंतु, यासंदर्भात तेथे कोणतेही काम झालेले नाही. यामुळे अशा मोकळ्या जागी महापालिकेच्या कचरा विभागातील कर्मचाऱ्यांनीच कचरा टाकला होता. त्याचा त्रास लगतच्या गृह निर्माण सोसायट्यांतील नागरिकांना होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर तो उचलण्यास सांगण्यात आले. परंतु, गावातील आरक्षित मैदानांवर सुविधाजनक क्रीडांगणे उभारण्याबाबतही तातडीने विचार करण्यात यावा, अशी विनंती ज्ञानेश्वर कटके यांनी मनपा प्रशासकांकडे केली आहे.
“वाघोली परिसरातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी योग्य तो निधी मुंजरीसह अशी कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाचे प्रयत्न आहेत. इलेक्ट्रिक शवदाहिनीचे कामही लवकरच करण्यात येईल.”
– विक्रम कुमार, आयुक्त/प्रशासक, पुणे महापालिका