अहमदाबाद : लहान मुलीचे अपहरण आणि बेकायदा ताब्यात ठेवण्याच्या प्रकरणात फरार असणारा स्वयंघोषित गुरू स्वामी नित्यानंद पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. त्याच्या कैलास डॉट ओआरजी या वेबसाईटवर त्याने त्याने स्वत:चे राष्ट्र उभारल्याचे जाहीर केले आहे. तसेच त्याचा ध्वज आणि घटनाही तयार केल्याचा दावा केला आहे.
त्याच्या या कथित देशाचे नाव हिंदू सार्वभौम राष्ट्र असून त्याचा कारभार पंतप्रधानासह मंत्रीमंडळ चालवत असल्याचे म्हटले आहे. या महान हिंदुराष्ट्राचे नागरिक बनण्यासाठी आणि या राष्ट्राच्या उभारणीसाठी देणगी देण्याचे आवाहन त्याने केले आहे. हे संकेत स्थळ 21 ऑक्टोबर 2018ला सुरू करण्यात आले असून ते 10 ऑक्टोबरला अपडेट करण्यात आले आहे. हे संकेत स्थळ पनामामध्ये नोंदणीकृत असून त्याच आयपी ऍड्रेस अमेरिकेतील डल्लास येथील दाखवत आहे.
मात्र हे कैलास राष्ट्र कोठे वसले आहे याची कोणतीही माहिती त्यात नाही. मात्र कैलास हे एक सीमारहित राष्ट्र असून ज्यांना आपल्या देशात हिंदुरितीप्रमाणे आराधना करता येत नाही अशा जगभरातून बेदखल हिंदुंनी ते स्थापन केले आहे. कैलास चळवळ ही अमेरिकेत उभारण्यात आली असून त्यात जात लिंग असा कोणताही भेद न करता हिंदु पध्दतीने कर्मकांड करण्याची मुभा असेल, असे त्यात म्हटले आहे. या राष्ट्राच्या ध्वजाला वृषभ ध्वज असे नाव दिले असून त्यात नंदी सोबत नित्यानंद दाखवण्यात आला आहे.
या देशाच्या पासपोर्टवर चारही लोकांच्या प्रवासांची मुभा असून त्यात कैलासासह अकरा दिशांना मुक्त प्रवास करता येईल, असे आमिष दाखवण्यात आले आहे.