भारताकडून पर्यायी योजनांवर विचार चालू; इराणवरील निर्बंधानंतरही इंधन उपलब्ध होणार

नवी दिल्ली – इराणकडून तेल खरेदीची सवलत अमेरिकेने बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर परिस्थितीचा सामना करण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत, असे भारताकडून सांगण्यात आले.

अमेरिकेने इराणवर निर्बंध लादल्यानंतरही भारतासह काही देशांना इराणकडून तेल खरेदीमध्ये सवलत दिली होती. अमेरिकेने आता ही सवलत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जो परिणाम होऊ शकतो त्याची आम्हाला कल्पना असून आम्ही पूर्णपणे तयार आहोत असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याकडून सांगण्यात आले.

मे 2019 पासून भारतीय रिफायनरींना होणाऱ्या तेल पुरवठ्यामध्ये कुठलीही कमतरता जाणवू नये. हा तेल पुरवठा सुरळीत सुरू राहावा यासाठी भारताकडे मजबूत योजना तयार आहे. जगातील अन्य मोठ्या तेल उत्पादक देशांकडून अतिरिक्त तेल पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पेट्रोल, डिझेल आणि अन्य पेट्रोलियम उत्पादनांची देशाची गरज भागवण्यासाठी भारतीय रिफायनरी पूर्णपणे सज्ज आहेत असे पेट्रोलियम मंत्रालयाकडून सांगण्यात आले. इराणकडून तेल आयात करणाऱ्या भारत आणि चीन या देशांना निर्बंधातून आणखी सवलत देणार नाही असे ट्रम्प प्रशासनाने सोमवारी जाहीर केले. इराणवर दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे.

तेल निर्यात हा इराणचा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. तेल निर्यात पूर्णपणे बंद करुन इराणची आर्थिक कोंडी करण्याची अमेरिकेची रणनीती आहे. इराणकडून टप्प्याटप्प्याने तेल आयात बंद करण्यासाठी भारतासह आठ देशांना नोव्हेंबर 2018 मध्ये अमेरिकेने निर्बंधातून आठ महिन्यांसाठी सवलत दिली होती. चीन, जपान, दक्षिण कोरीया, ग्रीस, टर्की, तैवान, इटली या देशांना अमेरिकेने सवलत दिली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.