इंधन दरवाढ : ‘मोदी सरकारच्या बहिरेपणावर इलाज करणं आवश्यक’

मुंबई  देशात इंधन आणि गॅसची सातत्याने दरवाढ होत आहे. या दरवाढीचा राज्यातील काँग्रेसने अनोख्या पद्धतीने निषेध केला आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसी इंधन दरवाढीचा निषेध म्हणून कॉंग्रेसचे मंत्री आणि आमदार आज विधानभवनात सायकलवरून आले. मोदी सरकारच्या इंधन दरवाढीचा निषेध करत विधान भवनात पोहोचल्यानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करताना इंधन दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी केली.

२०१४ पूर्वी भाजप नेते इंधन दरवाढीवरून आरडाओरडा करत होते. परंतु, तेच नेते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढ करून जनतेची लूट करत आहेत. दररोज इंधनाचे दर वाढत आहेत. जनतेच्या खिशातील पैसे अन्यायकारक पद्धतीने लुटले जात आहेत. मोदी सरकारला जनतेचा आवाज ऐकू येत नाही, त्यांच्या बहिरेपणावर इलाज करणे गरजेचे आहे, असा हल्लाबोल बाळासाहेब थोरात यांनी केला.

केंद्र सरकारने लावलेल्या अन्यायकारक करांमुळे इंधनाचे दर गगनाला भिडले असून महागाई प्रचंड वाढली आहे. पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसमध्ये प्रचंड दरवाढ करून केंद्रातील मोदी सरकारने जनतेचे जगणे मुश्कील केले आहे, असा आरोप काँग्रेसकडून यावेळी करण्यात आला. या दरवाढीचा निषेध केल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी मंत्रालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.