इंधन दरवाढप्रश्‍नी केंद्राचे हात वर!

प्रकाश जावडेकरांचे जागतिक बाजारपेठेकडे बोट

पुणे – “आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोलचे जे दर असतात, त्यावर देशातील पेट्रोलचे दर बदलत असतात, त्यामुळे तेथे दर कमी होतील अशी अपेक्षा करू,’ असे उत्तर देऊन माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत पेट्रोल दरवाढीबाबत फारशी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. याशिवाय “जीवनावश्‍यक गोष्टींचे दरही आता कमी झाले आहेत’ असा दावाही जावडेकर यांनी केला.

“केंद्र सरकारचा अर्थसंकल्प’ या विषयावर जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत सरकारची भूमिका मांडली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सुनील कांबळे, मुक्ता टिळक आणि सिद्धार्थ शिरोळे हे आमदार उपस्थित होते.

करोना काळात पहिल्या सहा महिन्यात “जीएसटी’ संकलनात बऱ्याच अडचणी आल्या परंतु दुसऱ्या सहा महिन्यात त्याचे संकलन विक्रमी म्हणजे सुमारे 1 लाख 20 हजार कोटी रुपये झाले, जे आजपर्यंतचे रेकॉर्ड आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही राज्याला तक्रार करायला संधी मिळणार नाही, असे जावडेकर यावेळी बोलातना म्हणाले.

जावडेकर म्हणाले…
– एकूण अर्थसंकल्पाचा विचार करता वित्तीय तूट या वर्षांत खूप झाली आहे, परंतु आम्ही येत्या दोन वर्षांत सगळे रांगेवर आणू
– मुलभूत सोयी सुविधांवर अधिक खर्च होतो. यातून रोजगार मिळतो. त्यामध्ये रस्ते, मेट्रो, प्रकल्प बांधणीचे उदाहरण घेता येईल.
– खासगी कंपन्यांनी गुंतवणूक करावी, यासाठी राज्यांनीच स्पर्धात्मक वृत्तीने प्रयत्न करावेत.
– भारताविरुद्ध कट कसा रचला जातो, याचे दर्शन टुलकीट प्रकरणातून झाले. त्यातून भारत कोलमडत नाही, उलट अशा गोष्टींनी जोरकसपणे उभा राहतो.

…म्हणून पुणे मेट्रोसाठी तरतूद नाही
पुणे मेट्रोसाठी अर्थसंकल्पात काहीच तरतूद झाली नाही कारण मेट्रोबाबत केंद्राकडे कोणताच नवा प्रस्ताव नाही. त्यामुळे तरतुदीचा विषयच नाही. मेट्रोचे पुण्यात अद्याप दोन टप्पे सुरू आहेत, असे जावडेकर यांनी नमूद केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.