नवी दिल्ली – सार्वजनिक इंधन कंपन्यांनी गुरूवारी पेट्रोल आणि डीझेलच्या दरांत लिटरमागे प्रत्येकी 35 पैशांची वाढ केली. इंधन दरवाढीचे सत्र सुरूच राहिल्याने अवघ्या तीन आठवड्यांत पेट्रोल 5 रूपयांनी, तर महिनाभरात डीझेल जवळपास 7 रूपयांनी महागले.
सार्वजनिक कंपन्यांनी तीन आठवड्यांच्या विश्रामानंतर सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पुन्हा दरबदलाची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे 24 सप्टेंबरपासून डीझेल, तर 28 सप्टेंबरपासून पेट्रोल दरवाढीचे सत्र सुरू झाले. तेव्हापासून पेट्रोलच्या दरात 18 वेळा वाढ होऊन ते 5 रूपये 35 पैशांनी महागले.
तर, डीझेलच्या दरात 21 वेळा वाढ होऊन ते 6 रूपये 85 पैशांनी महागले. सततच्या दरवाढीमुळे देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल दराने याआधीच 100 रूपयांची पातळी ओलांडली आहे. डीझेल दरानेही डझनभर राज्यांत शंभरीचा टप्पा पार केला आहे.