इंधन दरवाढीची पालिकेलाही झळ

पुणे -महापालिकेच्या अंदाजपत्रकात गेल्या चार वर्षांपासून ई-वाहन खरेदीसाठी तसेच वाहन भाडेतत्वार घेण्यासाठी तरतूद होती. पण, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणाऱ्या पालिका प्रशासनाला अखेर पेट्रोल आणि डीझेलच्या दरवाढीची झळ बसण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे महापालिकेकडून ई- वाहनांचा वापर वाढविण्याचा निर्णय घेतला असून अधिकारी व पदाधिकाऱ्यांसाठी पर्यावरणापूरक ई वाहने भाड्याने घेण्यात येणार आहेत.

यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. त्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात 38 वाहने महापालिका 8 वर्षांसाठी भाडेकराने घेणार असून 23 कोटी 28 लाख रुपये टप्पटप्प्याने देणार आहे. पेट्रोल, डीझेलवरील मोटारींसाठी प्रत्येक महिन्याला 63 हजार रुपये इंधन खर्च येतो. ई मोटारीसाठी एका महिन्यासाठी 58 हजार 350 रुपये खर्च येणार आहे. प्रत्येक मोटारीमागे प्रति महिना सरासरी 4 हजार 655 रुपये बचत होणार आहे.

38 वाहनांसाठी दरमहा 1 लाख 77 हजार रुपये खर्च कमी होणार आहे. केंद्र सरकारच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या मे. एनर्जी ईफिसिएन्सी लि. कडे महापालिकेने ई मोटारी भाडेतत्वावर पुरवण्यासाठी विचारणा केली होती. त्यानुसार मे. एनर्जी ईफिसिएन्सी लि. ने महापालिकेला टाटा नेक्‍सॉन कंपनीच्या ई मोटारी चालकासह 8 वर्षे भाडेतत्वावर देण्याची तयारी दाखवली आहे. 8 वर्षे कारचा वापर केल्यानंतर किमतीच्या 5 टक्के रक्कम भरून या कार पालिकेच्या मालकीच्या होऊ शकतात. वाहनांसाठी चालकासह 23 कोटी 28 लाख 88हजार रुपये खर्च येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.