नवी दिल्ली – महिनाभराच्या विश्रांती नंतर देशातील सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी पुन्हा इंधनात दरवाढ केली आहे. त्यामुळे देशातील इंधनाचे दर आजवरच्या सर्वोच्च पातळीवर गेले आहेत. या आधीची इंधन दरवाढ 7 डिसेंबरला झाली होती पण त्यानंतर मात्र दररोज जाहीर होणारी वाढ तेल कंपन्यांनी थांबवली होती.
पण आज पुन्हा महिनाभरानंतर पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 26 पैशांनी आणि डिझेल मध्ये प्रतिलिटर 25 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील डिझेलचा दर आता 80 रूपये 78 पैसे इतका झाला आहे. तर मुंबईतील पेट्रोलचा दर 90 रूपये 60 पैसे इतका झाला आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर 83 रूपये 97 पैसे आणि डिझेलचा दर 74 रूपये 12 पैसे इतका झाला आहे.
आंतरराष्ट्रीय तेलबाजारात कच्चा तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणात घसरलेल्या असताना त्यानुसार इंधनाच्या दरात कपात होणे अपेक्षित असताना सरकारने मात्र त्यावरील उत्पादन शुल्कात वाढ करून जनतेला मिळणारा लाभ स्वताच्याच पदरात पाडून घेतला आहे. त्यामुळे या किंमची चढ्याच राहिल्या आहेत.
सरकारने मार्च 2020 आणि मे 2020 या दोन टप्प्यांमध्ये पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात 13 रूपये प्रतिलिटर आणि डिझेलच्या दरात 15 रूपये प्रतिलिटर इतकी प्रचंड वाढ केली आहे. त्यातून सरकारला तब्बल 1 लाख 60 हजार कोटी रूपयांचा अतिरीक्त महसुल मिळाला आहे. मे महिन्यापासून आत्तापर्यंत पेट्रोलच्या दरात 14 रूपये 28 पैसे आणि डिझेलच्या दरात 11 रूपये 83 पैसे वाढ झाली आहे.