पुणे – गेल्या दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारने अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेल विक्रीवर मूल्यवर्धित करात वाढ करण्यात आली. या निर्णयामुळे इंधन प्रतिलिटर 1 रुपयांनी वाढणार असून याचा फटका एसटीच्या तिजोरीला बसणार आहे. यामुळे, एसटी महामंडळावर वर्षाला 45 कोटी 36 लाख रुपयांचा अधिकचा भार पडणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाचा संचित तोटा 5 हजारांपेक्षा अधिक आहे. त्यातच, एसटीच्या इंधन दरवाढीमुळे आणखी तोटा सहन करावा लागणार आहे. एसटी महामंडळाला प्रत्येक दिवशी 12 लाख 43 हजार लिटर इंधन लागते. आता प्रत्येक लिटरमागे अतिरिक्त पैसे मोजावे लागणार असल्याने एसटी महामंडळ आणखीन तोट्यात जाणार आहे. सध्या महामंडळाला प्रति लिटर 49.50 रुपयांनी इंधन भरावे लागते. तर, 1 एप्रिलपासून महामंडळाच्या गाड्यांना 50.50 रुपयांनी प्रति लिटर इंधन भरावे लागणार असल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.
तिकीट दर वाढण्याची शक्यता
राज्याच्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेल विक्रीवर मूल्यवर्धित करातील वाढीमुळे इंधनाच्या दरात आणखी एक रुपयांची वाढ होणार आहे. तसेच, इंधन दरवाढीने खासगी वाहतूक, टॅक्सी, रिक्षा व इतर वाहनांनादेखील आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे, इंधनात होणारा मोठा तोटा काही प्रमाणात भरून काढण्यासाठी पुढील काही दिवसांत एसटी व इतर खासगी वाहनांच्या तिकिट दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.