FSKA World Cup Karate Championship 2024 : राज्ञी अमित खानोलकर हिने २४ व्या FSKA कराटे वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य आणि कांस्य पदके जिंकत आपल्या कुटुंबासह देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे. ७ ते १० नोव्हेंबर २०२४ दरम्यान मापसा, गोवा येथे आयोजित या स्पर्धेत जगभरातून १५०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये श्रीलंका, इटली, कझाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, केनिया, पोर्तुगाल, अबू धाबी यांसारख्या देशांतील खेळाडूंसह भारतातील सर्व राज्यांतील प्रतिभावान खेळाडूंनी भाग घेतला.
राज्ञीने आपल्या शिस्तबद्धतेने, कठोर परिश्रमांनी आणि कौशल्यांच्या जोरावर या स्पर्धेत रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केली. अवघ्या ६ वर्षांच्या वयात जागतिक स्तरावर असे यश मिळवणे अतुलनीय आहे. हे यश तिच्या मेहनतीसोबतच प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचेही फळ आहे.
USKA (युनिव्हर्सल शोटोकान कराटे-डो असोसिएशन) च्या तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. USKA चे प्रशिक्षक राजेश सोलंकी, विकी सोलंकी, अमर वीरकर, उदय सोलंकी आणि साहिल बेंद्रे यांनी या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. USKA च्या अध्यक्षांनी सांगितले, “राज्ञीचे यश संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. तीने दाखवलेले कौशल्य आणि मेहनत हे देशातील इतर युवा खेळाडूंनाही प्रोत्साहन देतील.”
राज्ञीच्या पालकांनी तिच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना म्हटले, “राज्ञीने लहान वयात मोठी कामगिरी करून आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट निर्माण केली आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही नेहमी तिच्या पाठीशी उभे राहू.”
#BiharWACT2024 : भारतीय संघाची विजयी हॅट्ट्रिक; थायलंडचा 13-0 नं उडवला धुव्वा…
या स्पर्धेने शॉटोकान कराटेच्या जागतिक लोकप्रियतेला नवा आयाम दिला आहे. विविध देशांतील खेळाडूंनी एकत्र येऊन मैत्रीपूर्ण स्पर्धेत भाग घेतला, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी मैत्री आणि बंध तयार झाले. राज्ञीचे हे यश भारतातील कराटेच्या विकासासाठीही सकारात्मक ठरेल. तिच्या यशाबद्दल संपूर्ण कराटे समुदायाने तिला शुभेच्छा दिल्या आहेत.