गर्भवतींसाठी फळे व भाज्या

Aगरोदर स्त्रीला स्वतःबरोबरच आपल्या गर्भाचे पोषण व स्तन्य निर्मिती आहाराद्वारे करावी लागते. हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या तिने योग्य प्रमाणात खाव्यात. दुधी, दोडका, घोसावळी, कोहळा, कारले, भेंडी यांचा उपयोग करावा. दुधी हृदयाला पोषक व ब जीवनसत्त्वयुक्‍त असते. तर कोहळा आणि तोंडल्यात पित्त कमी करण्याची शक्‍ती असते.

भाज्या रासायनिक खतविरहित असाव्यात. रताळे, मशरूम, मका, सुरण या भाज्या पचायला जड असल्यामुळे खाऊ नयेत. अतिमसालेदार व तिखट भाज्या खाऊ नयेत. कोथिंबीर खावी, रोजच्या आहारात ती असावी. लिंबू, पुदिना, आले, हिरव्या मिरच्या, जिरे, ओले खोबरे व कोथिंबीर यांच्या हिरव्या चटणीने तोंडाला चव येते.

शक्‍यतो आल्याचा वापर जेवणात वाढवावा. साजूक तुपाचा वापर वाढवावा. कमीत कमी तेलात बनवलेले अन्नपदार्थ खावेत त्याचबरोबर फळे खाताना ताजी द्राक्षे रोज धुवून खावी. द्राक्षे नसल्यास काळ्या मनुका रोज खाव्यात. शहाळ्याचे ताजे पाणी गरोदरपणात रोज घ्यावे तसेच शहाळ्यातील कोवळे खोबरे हे पित्तशमन करणारे शक्‍तिवर्धक असते. गरोदर स्त्रीने फळे खाताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की फळे चिरल्या चिरल्या खावीत.

फळे दिवसा खावीत सूर्यास्तानंतर खाऊ नयेत. गरोदर स्त्रियांनी आंबट फळे खाऊ नयेत तसेच हवाबंद डब्यातील फळांचे रस पिऊ नयेत. दूध व फळे एकत्र करून खाऊ नयेत. मात्र रोज रात्री तीन-चार बदाम पाण्यात भिजत घालून ते सकाळी खावेत ज्यामुळे गरोदर स्त्रीची शक्‍ती वाढते त्याचबरोबर बाळाच्या मेंदूचे पोषण होते.

दिवसभरात ग्लासभर दुधात खारीक पावडर जरूर घालावी आणि ते प्यावे. एक-दोन खजूरही खावेत. अक्रोड, जर्दाळूमधून खावेत कारण ते पचायला जड असतात. गरोदर स्त्रीने रोज दोन चमचे मध खावा. ज्यामुळे बाळाची बुद्धी, रंग, कांती, नेत्र सारेच उत्तम होते. मध घ्यायचा असेल तर गरम दुधात घेऊ नये.

नियमितपणे केशर घेतल्याने गर्भाचे हृदय बलवान होते. शिवाय नैसर्गिक बाळंत व्हायला मदत होते. रोज मूठभर साळीच्या लाह्या खाव्यात किंवा त्याचे पाणी प्यावे. डिंकाचे लाडू आधी खाल्ले तरी हरकत नाही ज्यामुळे बाळाच्या हाडांची मजबुती वाढते.

– सुजाता गानू 

Leave A Reply

Your email address will not be published.