“नवीन फुल बाजाराचा फेरविचार करावा”

अखिल पुणे फुलबाजार आडते असोसिएशनची मागणी : बाजार समितीच्या नवनिर्वाचित प्रशासकांची घेतली भेट

पुणे – मार्केट यार्डात उभारण्यात येणाऱ्या नवीन अद्यायावत फुल बाजाराचा फेरविचार करावा, अशी मागणी फुल बाजारातील अखिल पुणे फुलबाजार आडते असोसिएशनने केली आहे. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी नवनिर्वाचित प्रशासक मधुकांत गरड यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. त्यावेळी नवीन फुल बाजाराबाबत चर्चा करण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी केली आहे.

त्यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अरूण वीर, प्रकाश काळे, सागर भोसले, बाप्पू कड आणि प्रमोद सातव उपस्थित होते. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले तेथे उपस्थित होते. याबरोबरच लॉकडाऊनमुळे 20 मार्च ते 18 जून या कालावधी फुल बाजार बंद होता. या कालावधीतील लाईट बील आणि जागा भाड्यामध्ये सुट द्यावी. 1990 मध्ये बाजार स्थापन झाल्यापासून बाजार समिती लॉईट बील हे वॅट प्रमाणे आकारात आहे.

आता 5 रुपये वॅट प्रमाणे लाईट बील व्यापाऱ्यांना भरावा लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर महावितरणचे मीटर व्यापाऱ्यांना देण्यात यावे. जेवढे बिल येईल, तेवढे व्यापारी भरतील. त्यामुळे बाजार समितीचेही नुकसान होणार नाही. केंद्र सरकारने नुकतेच शेतीमाल विक्री नियमन मुक्त केले आहे. त्यामुळे बाजाराच्या बाहेर शेतीमाल विकताना कसलाही कर द्यावा लागणार नाही. त्यामुळे बाजार आवारातील सेस माफ करावा, अशा मागण्या गरड यांच्याकडे करण्यात आलेल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.