पहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि बांगलादेशातील शेख हसीना यांच्या राजवटीचे पतन या भिन्न गोष्टी असल्या, तरी भारताच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आणि महत्त्वाच्या आहेत. आपण जगभर भ्रमण केले आणि भारताच्या आर्थिक प्रगतीचे आणि गुंतवणूकदारांना भारतात असलेल्या संधींचे कितीही ब्रँडींग केले तरी शेजारी आणि सीमेवर ज्या घटना घडत आहेत किंवा आकार घेऊ पाहत आहेत त्या दुर्लक्षित करता येत नाहीत. जो नफा कमावण्यासाठी भारतात गुंतवणूक करू इच्छितो त्या उद्योजकाला सगळीकडून शांतता आणि सुरक्षिततेची हमी हवी असते. रोज युद्धच होईल किंवा युद्धसदृश स्थिती आहे अशातला भाग नाही; तथापि, पाकिस्तान आणि बांगलादेश चीनकडून दिल्या जाणार्या प्रोत्साहनामुळे जे काही करत आहेत ते भारताला येणार्या काळात तापदायक ठरणार आहे.
भारतविरोधी कारस्थानांच्या त्यांच्या मालिकेतील अलीकडची समोर येत असलेली ताजी घटना म्हणजे ‘सार्क’सारखी संघटना स्थापन करण्याचा त्यांचा प्रयत्न. ही संघटना स्थापन होईल, भारताला त्यात सहभागी होण्याचे औपचारिक निमंत्रण दिलेही जाईल, मात्र ‘सार्क’मध्ये भारताची जी भूमिका आणि स्थान होते ते या नव्या संघटनेत नसेल त्याचे कारण चीन. चीनच्या पुढाकारानेच जर संघटना आकाराला येत असेल, तर चीनचे हेतू भारताला दुय्यम स्थानावर ढकलण्याचेच आहेत व त्याकरता पाकिस्तानच्या माध्यमातून अन्य शेजारी देशांना तो भरीला घालतो आहे. चीन आणि पाकिस्तान यांच्यात याबाबतची चर्चा बरीच पुढे गेली आहे. खुद्द पाकिस्तानच्या माध्यमांनीच याला सविस्तर प्रसिद्धी दिली आहे. अलीकडेच म्हणजे 19 जूनला चीनच्या कुनमिंग येथे एक बैठक झाली होती.
त्यात अंतरिम सरकार अस्तित्वात असलेल्या बांगलादेशलाही सहभागी करून घेण्यात आले होते. दक्षिण आशियातील जी राष्ट्रे ‘सार्क’चे सदस्य राहिले आहेत त्यांना सहभागी करून घेणे हा या कुनमिंगमधील बैठकीचा उद्देश होता. मे महिन्यात अशीच एक बैठक अफगाणिस्तानला सहभागी करून घेत झाली होती. अफगाणमधील तालिबानी राजवटीशी संघर्ष सुरू असला, तरी त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जातो आहे त्याचे कारण चीनचे या भागात गुंतलेले आर्थिक हितसंबंध. चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर अर्थात सीपीईसीचा चीनला अफगाणिस्तापर्यंत विस्तार करायचा आहे. ‘सार्क’ची स्थापना 8 डिसेंबर 1985 रोजी झाली होती. त्यात जे सात संस्थापक सदस्य राष्ट्र होते आणि नंतर सहभागी झालेला अफगाणिस्तान या सगळ्यांना आपल्या पट्ट्यात घेण्याचा चीनचा प्रयत्न आहे. ‘सार्क’ची शेवटची बैठक 2014 मध्ये काठमांडूत झाली होती. नंतरची बैठक पाकिस्तानात होणार होती.
उरी येथे दहशतवादी हल्ला झाला आणि भारताने त्या बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यानंतर एकही बैठक झालेली नाही. भारत आणि पाकिस्तानातील आजचे संबंध जगजाहीर आहेत. प्रचंड तणाव या दोन देशांत आहे आणि सर्व व्यवहार बंद आहेत. बांगलादेशातही मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार आल्यापासून भारताचे त्या देशाशी संबंध पूर्वी कधी नव्हते एवढे बिघडले आहेत. अन्य शेजारी देश असलेल्या श्रीलंकेशी सामान्यत: भारताचे चांगले संबंध राहिले आहेत. भारत या देशाला आर्थिक आणि अन्य सर्वच बाबतींत सहकार्य करत असतो. श्रीलंकेचे नवे राष्ट्रपतीही भारताशी मैत्रीपूर्ण संबंध कायम राहण्याच्याच बाजूने असल्याचे त्यांच्या भारत भेटीतून त्यांनी सूचित केले आहे. नेपाळ आणि भारताचे ऐतिहासिक संबंध आहेत. या दृढ संबंधांना धार्मिक-सांस्कृतिक किनारही आहे.
मात्र गेल्या दशकभरातील नेपाळमधील अस्थिर राजकीय परिस्थिती आणि चीनचा तेथेही वाढत चाललेला प्रभाव याची नेपाळ भारत संबंधांवरील छाया गडद होत चालली आहे. मालदीवसोबतच्या नात्यातही अलीकडच्या काळात बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. चीनची येथेही गुंतवणूक आणि प्रभाव वाढतो आहे. यात केवळ भूतान हाच ‘सार्क’मधील एकमेव देश भारतासोबत घट्ट राहिला आहे. थोड्याफार प्रमाणात आता श्रीलंकाही तसाच होऊ पाहत आहे. चीन आपले भू राजकीय हित साधण्याचा भाग म्हणून भारतापुढे याच देशांचा वापर करत अडचणी निर्माण करण्याचा अथवा भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतो. चीनचा दक्षिण आशियातील वाढत जाणारा प्रभाव भारतासमोर आव्हान आहेच, भविष्यात त्याची व्याप्ती अधिकच वाढत जाणार आहे.
पाकिस्तान आणि बांगलादेश व अफगाणिस्तानसोबत त्यांच्या झालेल्या बैठका या सामान्य घडामोडी नाहीत. ‘सार्क’सारखी पर्यायी व्यवस्था उभी करण्यात आली आणि भारताला तेथे दुय्यम स्थानावरच समाधान मानावे लागणार असेल तर त्याचे अनेक तोटे असतील. विभागीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी भारताने ‘बिमस्टेक’ आणि ‘इंडो पॅसिफिक’सारख्या मंचांच्या माध्यमातून जरी आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध दृढ करण्याचा प्रयत्न केला असला तरी पूर्वी जे स्थान भारताचे होते ते चीनच्या वाढत्या प्रभावामुळे आणि विभागातील सहभागामुळे आता राहणार नाही व भारतासाठी गोष्टी तेवढ्या सोप्याही नसतील. भारताचा प्रभाव कमी करणे आणि शक्य तेवढी कोंडी करणे अशी आखणी केली जाते आहे किंवा केली गेली आहे. अर्थात, भारताची अर्थव्यवस्था अन्य देशांच्या तुलनेत भक्कम आहे.
राजनैतिक स्तरावरही भारताने जगातील बहुतांश प्रमुख मंचांवर आपला प्रभाव पाडत पाकला गेल्या काही काळात एकाकी पाडले आहे. तथापि, रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायल-हमास आणि इस्रायल आणि इराण संघर्ष आणि अमेरिकेतील गोंधळेलेली राजवट आदी बाबी आणि त्यात युरोपीय देशांतही निर्माण झालेली संभ्रमाची स्थिती असे अगदी विचित्र वातावरण जगात आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या अगदी शेजारी काय होते आहे आणि होऊ पाहते आहे याची भारताला खास खबरदारी घ्यावी लागेल.