15 लाख 61 हजार मतदार; 9 एप्रिलपर्यंत अर्ज स्वीकारणार
नगर: शिर्डी (अ.जा.) लोकसभा मतदारसंघासाठीची अधिसूचना उद्या दि. 2 एप्रिल रोजी जारी होणार असून त्या दिवसापासूनच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पिराजी सोरमारे यांनी दिली.
राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. अधिसूचना जारी होण्याच्या आधी सोरमारे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, शिर्डीचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यावेळी उपस्थित होते. शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी 2 एप्रिल रोजी अधिसूचना निघेल. नामनिर्देशन भरण्याचा अंतिम दि.9 एप्रिल असून नामनिर्देशनपत्रांची छाननी 10 एप्रिल रोजी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 12 एप्रिल ही आहे. दि.29 एप्रिल रोजी मतदान होणार असून दि. 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे. नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचे ठिकाण हे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांचे दालन निश्चित करण्यात आले आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सहाय्य करण्यासाठी उपजिल्हाधिकारी (रोहयो) जितेंद्र वाघ यांची नियुक्ती विनिर्दिष्ट सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. या लोकसभा मतदारसंघासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जितेंद्र वाघ (अकोले), शशिकांत मंगरुळे (संगमनेर), गोविंद शिंदे (शिर्डी), राहुल मुंडके (कोपरगाव), तेजस चव्हाण (श्रीरामपूर) आणि शाहुराज मोरे (नेवासे) यांना नियुक्त करण्यात आले आहे.
नामनिर्देशनपत्र भरताना उमेदवारांसह केवळ 4 जणांनाच दालनात येता येईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कक्षात मोबाईल वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पर्यायापैकी कोणत्याही पर्यायाचा वापर करुन अर्ज भरता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नामनिर्देशनपत्र भरण्याच्या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला असून या ठिकाणापासून 100 मीटर परिसरात या प्रक्रिये दरम्यान फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. तीनपेक्षा जास्त वाहने आणि 4 पेक्षा जास्त व्यक्तींना घेऊन नामनिर्देशन ठिकाणामध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे, असे सोरमारे यांनी स्पष्ट केले.
या मतदारसंघात 15 लाख 61 हजार 550 मतदार असून त्यात पुरुष 8 लाख 10 हजार 889 तर महिला 7 लाख 50 हजार 606 मतदार आहेत. या मतदारसंघात 1 हजार 710 मतदार केंद्र असून 7 हजार 600 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे सोरमारे यांनी सांगितले.