उजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला

file photo

प्रस्तावित योजना कोणी अडवली : इंदापूर तालुक्‍यात आरोप- प्रत्यारोप उफाळणार

नीलकंठ मोहिते

रेडा- इंदापूर तालुक्‍यातील जवळपास 65 गावांतील शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी सन 1993 व 94 तसेच 95 या वर्षांमध्ये उजनीतून पाणी उचलण्याची योजना सध्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी शासनाला पटवून देत मंजूर करून घेतली होती. मात्र, योजनेला मंजुरी मिळाली असताना देखील का अस्तित्वात आली नाही, या योजनेला कोणी खोडा घातला, योजनेतील लाभ आणि तोटा या प्रश्‍नांवर इंदापूर विधानसभेची निवडणूक गाजणार आहे. विधानसभेच्या तोंडावर या वादाला तोंड फुटले आहे. त्यामुळे प्रचारात आमदार दत्तात्रय भरणे, माजी सहकारमंत्री हर्षवधर्न पाटील, प्रदीप गारटकर हे योजनेच्या केंद्रबिंदू राहणार आहेत.
इंदापूर तालुक्‍याच्या हद्दीला खेटून असणारा अथांग उजनी जलाशय आहे. मात्र, बॅकवॉटर परिसर वगळता तालुक्‍यातील इतर भागातील शेतकऱ्यांच्या शेतीला उजनी जलाशयातील पाण्याचा कोणत्याही प्रकारे फायदा होत नाही. किंवा शेतकऱ्यांच्या हक्‍काचे असणारे उजनीचे पाणी मिळत नाही. त्यामुळे हजारो हेक्‍टर क्षेत्र इंदापूर तालुक्‍यातील आजही पडीक आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या नावावर शेतीचा उतारा मोठा दिसतो. या शेतीच्या उताऱ्यापेक्षा देखील कर्जाचा बोजा अधिकचा निर्माण झाला आहे. शेती कसण्यासाठी पाण्याची शाश्‍वत व्यवस्था नाही. हाच भविष्यकाळ ओळखून पतित पावन संघटनेचे तत्कालीन नेते व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी शेतकऱ्यांची नस ओळखून उजनीतून पाणी उचलण्याची एक अभिनव योजना शासनाला पटवून दिली.

तत्कालीन पाटबंधारे मंत्री शिवरकर यांच्यामार्फत ही योजना मंजूर करून घेतली होती. मात्र, या कालावधीत गारटकर हे राजकीय पदावर नव्हते. तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी योजनेला डोक्‍यावर घेत तब्बल दोन-तीन विधानसभेला गारटकर यांना साथ देण्याचे धोरण ठरवत कार्यकर्त्यांचे मोहळ नसतानादेखील सत्तेच्या विरोधात मोठा मताचा गट्टा गारटकर यांच्या मागे उभा केला होता. मात्र, ही योजना जर कार्यान्वित झाली असती तर गारटकर हे इंदापूरचे लोकप्रतिनिधी बनले असते, अशी भीती त्याकाळच्या सत्ताधाऱ्यांना वाटली. त्यामुळे या योजनेला वरिष्ठ स्तरावरून खो घालण्यात आला होता. यामध्ये ही योजना अस्तित्वात न आल्यामुळे आजही तालुक्‍यातील हजारो हेक्‍टर शेती पाण्याविना पडिक राहिली आहे. या योजनेला आडकाठी कोणी आणली, याबाबत तालुक्‍यात राजकीय आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

  • आगपाखड होणार
    मागील 70 वर्षांपासून इंदापूर तालुक्‍याच्या इतिहासात पहिल्यांदाच दुष्काळी भयानक स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीला नैसर्गिकच म्हणावे लागेल. त्यामुळे मुबलक पाऊस तालुक्‍याच्या हद्दीत झाला नाही. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी शासनाच्या टॅंकरवर अवलंबून राहावे लागले. ही परिस्थिती बदलण्यासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांनी पाटबंधारे मंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना उजनी धरणातून तालुक्‍यातील पाझर तलाव भरण्याची योजना पूर्ण व्हावी, यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. तरी पूर्वी मंजूर झालेली उजनीतून पाणी उचलण्याची योजना का झाली नाही, यावर जबरदस्त आगपाखड होणार हे निश्‍चित मानले जात आहे.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here