जागेवरून नगरसेवकांत जोरदार खडाजंगी

पाणीपुरवठा ठेकेदार न्यायालयात गेल्याने सभेत चर्चा ः कोपरगाव नगरपालिका सर्वसाधारण सभा

कोपरगाव – कोपरगाव नगरपालिकेच्या नवीन 42 कोटी रुपये खर्चांच्या पाणीपुरवठा योजनेच्या प्रलंबित बिलावरून ठेकेदाराने न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्याचे पडसाद नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. तसेच जागेच्या विषयावरून नगरसेवकांत चांगलीच खडाजंगी झाली.

पालिकेची नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेली सर्वसाधारण सभा साडेसहा तास चालली. सभेस उपनगराध्यक्ष विजय वाजे, भाजप गटनेते रवींद्र पाठक, शिवसेना गटनेते योगेश बागूल, राष्ट्रवादीचे गटनेते वीरेन बोरावके, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे आदींसह सर्व नगरसवेक उपस्थित होते. शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी नवीन 42 कोटी रुपये खर्चाच्या योजनेचे काम विजय कन्स्ट्रक्‍शन कंपनीस देण्यात आले आहे. सदर कंपनीचे ठेकेदार विजय मुंडे हे सहकार्य करीत नसल्याने त्यांचा ठेका रद्द करण्यात यावा, असा अहवाल पाणीपुरवठा विभागाचे तत्कालीन अभियंता प्रकाश लोखंडे यांनी दिला होता. त्यावरून पालिकेच्या सभेत एकमुखाने मुंडे यांचा ठेका रद्द करण्याचा ठराव मंजूर झाला. दरम्यान नवीन ठेकेदार नेमण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागला. या कालावधीत मुंडे यांना काम करावे लागले.

दरम्यान, पालिकेकडून ठेका रद्द झाल्याने मुंडे यांना बिल अदा करण्यात आले नाही. या विरोधात मुंडे यांनी न्यायालयात दावा दाखल केला. त्यावर न्यायालयाने पालिकेस मुंडे यांना 1 कोटी 76 लाख सव्याज रक्कम देण्याचे आदेश दिले. या आदेशा विरोधात पालिकेने अपिल दाखल केले आहे. हा मुद्दा आजच्या सभेत चर्चेस आला.

नगरसेविका भारती वायखिंडे, नगरसेवक शिवाजी खांडेकर व रवींद्र पाठक यांनी नळांना स्वच्छ पाणी येत नसल्याच्या तक्रारी करीत चांगलेच तोंडसुख घेतले. उपनगराध्यक्ष वाजे यांनी पाणी योजनेचे ठेकेदार मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. हर्शा कांबळे यांनी हनुमानगर व 105 भागात दूषित पाणी येत असल्याचे सांगीतले. हाजी महेमुद सय्यद यांनी वैष्णव देवीच्या पाठीमागे 7-8 घरांना गेल्या 3-4 वर्षांपासून पाणी मिळत नसल्याची तक्रार केली. त्यावर मुख्याधिकारी सरोदे यांनी संबंधितांकडे थकबाकी असल्याचे स्पष्ट केले.

बागूल यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मदत घेऊन पाणी पुरवठा नियोजनात सुधारणा करण्याची मागणी केली. अनिल आव्हाड यांनी वहाडणे यांना तुम्ही नक्कीच चांगली कामे करता. पण आम्हाला लोकांपासून तोंड लपवून जावे लागते. नगरसेवकांची कामे होत नाहीत. परंतु नगराध्यक्षांची होतात, असे म्हटले. मंदार पहाडे यांनी दूषिक पाण्याचा विषय उपस्थित केला. त्यावर मुख्याधिकारी सरोदे यांनी जुन्या जलवाहिन्यांत गटारींचे पाणी जात असल्याची कबुली दिली. सपना मोरे यांनी पालिका कर्मचारी महिला नगरसेवकांचे ऐकत नाही, असा आरोप केला. संजय पवार यांनी संजयनगर, समतानगर व खडकी भागात भूमिगत गटारी करण्याची मागणी केली.

यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा बसविणे व सुशोभीकरण कामास मंजुरी देण्यात आली. गांधीनगरमध्ये उर्दू शाळेस जागा देण्याच्या मुद्यावरून अपक्ष नगरसेवक हाजी महेमुद सय्यद व शिवसेना नगरसेवक अनिल आव्हाड यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी बागूल यांनी आव्हाड यांच्याकडून झालेल्या वक्तव्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानाजवळील जागा सभा, समारंभासाठी देताना 10 हजार रुपये अनामत रक्कम घेण्याचा ठराव संदीप वर्पे यांनी मांडला. त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. पाठक यांनी कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्यांच्या नोंदींवर अक्षेप घेतला.

सय्यद यांनी गांधीनगरच्या गल्लीबोळात घंटागाडी, रुग्ण्वाहीका जात नसल्याने अतिक्रमणे काढण्याची मागणी केली. त्यावर वहाडणे यांनी अतिक्रमण विरोधी पथक तयार करून कारवाई करण्याची सुचना केली. खोका शॉपच्या सुधारित प्रस्तावास मंजुरी देण्यात आल्याचे सांगण्यात आले. परप्रांतीय व्यावसायीकांकडून काहीजण पैसे घेत असल्याचा गंभीर आरोप यावेळी केला गेला. तो वहाडणे यांनी मान्य केला. जनार्दन कदम यांनी माजी सैनिकांना मालमत्ता करामध्ये 10 टक्के सूट देण्याची मागणी केली. त्यावर सभागृहाने पाच टक्के सूट देण्याचा ठराव मंजूर केला. सत्येन मुंदडा यांनी शहरातील जाहिरात फलकांना मुदत व दर ठरविण्याची मागणी केली. चर्चेत आरीफ कुरेशी, स्वप्नील निखाडे, वर्षा गंगुले, प्रतिभा शिलेदार आदींनी सहभाग घेतला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)